दारू प्यायल्याचा जाब विचारल्याने ठाण्यात जावयाने केली सासूची हत्या

By जितेंद्र कालेकर | Published: September 11, 2018 06:44 PM2018-09-11T18:44:27+5:302018-09-11T19:51:42+5:30

मद्यपी जावयाच्या श्रीमुखात लगावून जाब विचारणाऱ्या कमलजीतकौर सामलोग (६८) या सासूचा खून करणा-या अंकुश भट्टी (३२) या जावयाला कासारवडवली पोलिसांंनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

Mother in law killed by her son in law at Thane | दारू प्यायल्याचा जाब विचारल्याने ठाण्यात जावयाने केली सासूची हत्या

सासूने फैलावर घेतल्याचा राग

googlenewsNext
ठळक मुद्देदिड वर्षांपूर्वी झाला होता विवाहपत्नीला केली होती मारहाणसासूने फैलावर घेतल्याचा राग

ठाणे : मद्य प्राशन केल्याने जावयाच्या श्रीमुखात लगावून जाब विचारणा-या कमलजीतकौर सामलोग (६८) या सासूचा खून करणा-या अंकुश भट्टी (३२) या जावयाला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. मारहाणीनंतर सासूला पहिल्या मजल्यावरील घरातील खिडकीतून बाहेर फेकल्यानंतर तब्बल तीन तास खुनी जावई घरातच निर्विकारपणे बसून होता.

दीडच वर्षांपूर्वी मनजीतसिंग सामजोग (४२, रा. रुमाबाली सोसायटी, भार्इंदरपाडा, घोडबंदर रोड, ठाणे) या घटस्फोटीत महिलेशी दहा वर्षांनी लहान असलेल्या ३२ वर्षीय अंकुशचे लग्न झाले होते. गरिब घरातील अंकुशने वयाने मोठ्या तसेच कर्णबधीर असलेल्या या मुलीला स्वीकारल्याने सामलोग कुटूंबियांनी त्याला त्यांच्या भिवंडीतील ट्रान्सपोर्टच्या उद्योगातच नोकरी दिली होती. शिवाय, त्याला जाण्या येण्यासाठी कारही दिली होती. तरीही व्यसनी अंकुशचे मनजीतसिंग बरोबर कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होते. तो तिच्याकडे सतत पैशांसाठीही तगादा करीत होता. अलिकडेच तिला त्याने दारू पिऊन मारहाण करायला सुरुवात केली होती. हा प्रकार तिने आपल्या आईलाही सांगितला होता. त्यामुळेच आई कमलजीतकौर या सोमवारी लेकीला भेटायला आल्या होत्या. दुपारी जावई अंकुश हा दारुच्या नशेतच घरात शिरला. त्याला अशा अवस्थेत पाहून कमलजितकौर यांनी त्याच्या दोन श्रीमुखात लगावून जाब विचारला. यातूनच चिडल्याने सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यांच्यात झटापटीही झाली. त्यावेळी बेडरुममध्येच त्याने बॉडी स्प्रेच्या बाटलीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केले. रक्तबंभाळ होऊनही सासू ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून त्याने तिला उचलून १०४ क्रमांकाच्या पहिल्या मजल्यावरील घरातील खिडकीतून खाली फेकले. त्यानंतर कोणाला काही सांगितल्यास पत्नीलाही ठार मारण्याची त्याने धमकी दिली. रात्री सव्वा आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तास तो घरातच बसून होता. रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याने इमारतीखाली येऊन आरडाओरडा करून सासू खाली पडल्याचा कांगावा केला. शेजाºयांनीच या घटनेची माहिती कासारवडवली पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक प्रदीप उगले यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत बेडरुममध्येच रक्ताचे ढाग आणि काही खूणा आढळल्या. त्यावरुनच त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने या खूनाची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mother in law killed by her son in law at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.