मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:43 PM2019-05-27T23:43:12+5:302019-05-27T23:43:35+5:30

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधली होती.

The mother is next to herself | मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल

मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल

googlenewsNext

- सदानंद नाईक
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधली होती. मात्र, गेल्या निवडणुकीपेक्षा फक्त पाच हजार मतांची वाढ झाली. या मतदारसंघात आमदार राष्ट्रवादीचा असताना त्या पक्षाच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढण्याऐवजी तब्बल १० हजारांनी कमी झाले. परस्परांत समन्वय नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गायब, तर काँगे्रस पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र होते. ओमी कलानी टीम युतीच्या प्रचारात सहभागी, तर राष्ट्रवादीच्या आमदार व शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरल्या नसल्याचे दिसत होते. पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाचे वर्चस्व दिसले. सिंधीबहुल मतदारसंघात कलानी कुटुंबाला मानणारे मतदार असल्याने, वाढीव मताधिक्यासाठी ठाणे व रायगडच्या पालकमंत्र्यांनी अनेकदा ‘कलानी महल’चे उंबरठे झिजवले. तसेच भाजप-शिवसेना, ओमी कलानी टीम, रिपाइं व स्थानिक साई पक्षांना एकत्र आणून निवडणूक कामाला जुंपले. पालकमंत्र्यांनी एक लाख मताधिक्याचे टार्गेट ठेवले होते. प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीपेक्षा पाच हजारांनी मताधिक्य वाढले. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना १५ हजार ५६४ मते मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल १० हजारांनी त्यांचे मताधिक्य कमी झाले. वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडावू यांना १२ हजार ४१५ मते मिळाली. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना समन्वयाअभावी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइं गवई गट व पीआरपीच्या जिल्हाध्यक्षाने शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडी व युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.
आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लढाईपूर्वीच शस्त्रे म्यान केली होती. पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांना प्रचारासाठी कार्यकर्ते व बुथ एजंट मिळू नये. ही राष्ट्रवादीची मोठी शोकांतिका आहे. यामागे ज्योती कलानी यांचे पुत्रप्रेम हे कारण असल्याचे बोलले जाते. ओमी कलानी हे आमदारकीसाठी इच्छुक असून भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा द्यावा, असा समझोता लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यात झाल्याची चर्चा आहे. कलानी निवडणूक रिंगणात उतरल्यास, ज्योती कलानी यांची माघार निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे.
>मध्यवर्ती गोलमैदान भागात कार्यालय : मराठीसह सिंधी समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी एका वर्षापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोलमैदान या मध्यवर्ती ठिकाणी पक्ष कार्यालय उघडले. दरआठवड्याला सर्वांसोबत संवाद साधून जनसंपर्क वाढवण्याचे काम शिंदे यांनी केले. वडील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बहुतांश पक्षांची मोट बांधली.
>की फॅक्टर काय ठरला?
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाचा प्रभाव आहे. हे ओळखून भाजपने ओमी कलानी टीमला सोबत घेऊन महापालिकेची सत्ता हस्तगत केली. लोकसभेत युतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळण्यासाठी ठाणे व रायगडचे पालकमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण यांनी कलानी यांची मनधरणी केली. उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ‘कलानी महल’ गाठला तसेच शहरात तळ ठोकला होता.
>विधानसभेवर काय परिणाम?
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती कायम राहिल्यास, हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल. आमदारकीचे तिकीट आयलानी की कलानी, असा पेच निर्माण होणार आहे. आयलानी यांना उमेदवारी दिल्यास, भाजपला कलानी यांची समजूत कशी काढणार, असा प्रश्न आहे.

Web Title: The mother is next to herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.