मायलेकाच्या भेटीने मकरसंक्रांत झाली गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:32 AM2019-01-17T00:32:26+5:302019-01-17T00:32:39+5:30

पोलिसांची कामगिरी : दिव्यांग अल्ताफ चार वर्षांपासून होता आईविना

mother son meet on makar sankranti | मायलेकाच्या भेटीने मकरसंक्रांत झाली गोड

मायलेकाच्या भेटीने मकरसंक्रांत झाली गोड

- पंकज रोडेकर


ठाणे : नालासोपाऱ्यातून हरवलेला बारावर्षीय दिव्यांग अल्ताफ आणि त्याच्या आईची ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या प्रयत्नांमुळे पुनश्च भेट घडून आली आहे. विशेष म्हणजे ही भेट मकरसंक्रांतीच्या दिवशीच झाल्याने अल्ताफच्या आईसाठी आणि ठाणे पोलिसांसाठी संक्रांतीचा सण खºया अर्थाने गोड झाला. या मायलेकाची भेट घडवून आणण्यात उत्तर प्रदेशच्या पोलिसांचीही मदत मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक मंजूषा भोंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रोहिणी सावंत, नितीन पाटील, प्रमोद पालांडे ही मंडळी मुंबईतील डोंगरी बालसुधारगृहात मुस्कान मोहिमेंतर्गत कामासाठी गेले होते. तिथे मायेचे छात्र हरवलेल्या मुलांमध्ये अल्ताफ नावाचा दिव्यांग मुलगा पाहून त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता. त्याला बोलते करण्यासाठी पथकाने आईवडील, बहीणभावाची नावे विचारली. बराच प्रयत्न केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील बरेली येथील काका टोळे की बचेरी या शाळेत जातो, असे त्याने सांगितले. तेथून त्याच्या पालकांच्या शोधमोहिमेला सुरुवात झाली. ठाणे पोलिसांनी ती शाळा शोधण्यासाठी तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, त्याच्या नातेवाइकांचाही शोध घेतला. हे प्रयत्न यशस्वी झाले आणि स्थानिक पोलीस त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचले. त्यांच्या भेटीतून अल्ताफ आईसोबत नालासोपारा परिसरात उपचारार्थ राहत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पालघर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. तो १२ डिसेंबर २०१८ रोजी हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती वाळीव पोलिसांनी दिली. त्यानुसार, ठाणे पोलीस त्याच्या आईपर्यंत पोहोचले. मकरसंक्रांतीच्या दिवशी अल्ताफ व त्याच्या आईची भेट घडवून दिली, तो क्षण अविस्मरणीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.


अल्ताफ दिव्यांग असून, उपचारासाठी आईने त्याला मुंबईत आणले होते. मूळचे उत्तरप्रदेशचे हे मायलेक नालासोपारा येथे राहत होते. अल्ताफ डोंगरी बालसुधारगृहात कसा पोहोचला, याबाबत माहिती मिळाली नाही. मायलेकाची भेट घडवून देण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनीही मदत केली.
- मंजूषा भोंगळे, सहायक पोलीस निरीक्षक,
चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, शहर पोलीस, ठाणे

Web Title: mother son meet on makar sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.