बाळाला पळवणारी महिलाच तीन मुलांची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 05:00 AM2018-01-19T05:00:45+5:302018-01-19T05:00:53+5:30
ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाला पळवणाºया महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी घेतलेल्या सहापैकी तीन मुले तिची स्वत:चीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित तीन मुलांचा तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाणे : ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाला पळवणाºया महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी घेतलेल्या सहापैकी तीन मुले तिची स्वत:चीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित तीन मुलांचा तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून १४ जानेवारी रोजी नवजात बाळाला एका महिलेने पळवले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने डोंबिवली येथील आरोपी महिला गुडिया राजभर, तिचा पती सोनू राजभर आणि शेजारी विजय श्रीवास्तव उर्फ कुबड्या यांना अटक करून नवजात बाळाला मातृछत्र मिळवून दिले. आरोपींच्या ताब्यात नवजात बाळाव्यतिरिक्त आणखी सहा मुले होती. ही मुले त्यांचीच आहेत अथवा नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन ते ११ वर्षे वयोगटातील ही मुले तूर्तास नवी मुंबई आणि नेरूळ येथील बालसुधारगृहात संगोपनासाठी ठेवली आहेत. सर्व मुले आपली स्वत:ची असल्याचा दावा आरोपी महिलेने पोलिसांजवळ केला आहे. स्वत:ची सहा मुले असताना नवजात बाळ चोरण्याचे कारण काय, या मुद्द्यावर पोलिसांनी विचारणा केली असता, महिलेने वेगवेगळी उत्तरे दिली. तिच्या ताब्यातून घेतलेल्या सहा मुलांमध्ये पाच मुली आणि एक मुलगा आहे. म्हातारपणी आधारासाठी आणखी एक मुलगा असावा, यासाठी आपण रुग्णालयातून बाळ चोरले होते, असे या महिलेने पोलिसांजवळ सांगितले. महिलेसोबत अटक केलेला तिचा शेजारी विजय श्रीवास्तव याला मूलबाळ नाही. त्याला आधार मिळावा, यासाठी बाळ चोरल्याची विरोधाभासी माहितीही महिलेने पोलिसांना दिली. तिच्या ताब्यातील सहा मुलांचे तथ्य तपासण्यासाठी पोलिसांनी डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी दुसरीकडे महिलेचे शेजारी आणि नातलगांकडेही चौकशी सुरू आहे.
सर्व मुले आरोपी दाम्पत्याचीच असावीत, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी महिलेचा शेजारी विजय श्रीवास्तव उर्फ कुबड्या याच्याविरुद्ध दादर आणि मुंबईतील सीएसटी परिसरात अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहितीही मिळाली आहे. ती पडताळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.