मातृभाषेतील शिक्षण संवेदनशील नागरिक घडवू शकते : प्रा. आदित्य दवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:17 PM2018-10-07T16:17:03+5:302018-10-07T16:19:16+5:30
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या 'सर्ज' या माजी विद्यार्थी संघटनेने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रा. आदित्य दवणे यांचे 'फक्त लढ म्हणा..!' हे व्याख्यान आयोजित केले होते.
ठाणे : हल्ली चारही बाजूने मुलांना करिअर मार्गदर्शन मिळत आहे, परंतु आज मुलांना गरज आहे ती भावनिक मार्गदर्शनाची, असे वक्तव्य प्रा. आदित्य दवणे यांनी 'फक्त लढ म्हणा..!' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांना उद्देशून केले.
मुलांशी संवाद साधताना ते म्हणाले की, स्वतः तली बलस्थानं ओळखून आयुष्याला सामोरे जा. स्वामी विवेकानंदनाच्या 'उठा-जागे व्हा-आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका' या संदेशाची आठवण करून देताना, 'उठा आणि जागे व्हा' या दोन शब्दांमधला अपेक्षित अर्थ सांगितला. मराठी माध्यमातुन शिकणाऱ्या मुलांचे त्यांनी अभिनंदन करत, 'देशाला गरज असेल तर आज संवेदनशील नागरिकांची गरज आहे आणि असे नागरिक मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळाच घडवू शकतात' असे वक्तव्य त्यांनी केले. प्रेम या अडीच अक्षरांचा अर्थ समजावून देताना तुम्ही जिद्द नावाचं भिंग हुडकून काढा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 'जगाला तुमच्या राडकथा ऐकण्यात रस नाही, तुम्ही त्यांना तुमची यशोगाथा ऐकवा, जग तुमचा सत्कार करेल आणि तुमची उदाहरणं भविष्यातील पिढ्यांना देईल' हे वास्तवाचे भान विद्यार्थ्यांना दिले. एकंदरीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम मुलांमुळे रंगला असे त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मत मांडले. व्याख्यानाची सांगता कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या 'कणा' या कवितेने व तिच्या अर्थाने केली. व्याख्यान रोमांचकारी आणि आयुष्याला दिशा देणारे होते असे मत विद्यार्थ्यांनी प्राध्यापक आदित्य दवणेंशी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिक डॉ. संगीता दीक्षित आणि सर्ज संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे माजी विद्यार्थी स्वप्नील मयेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले. सुवर्ण मोहित्सवी वर्षात 50 सत्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मानस सर्ज या संस्थेचा आहे.