ए आई, दोन कोटींचा फ्लॅट बक्षीसपत्रात लिहून दे; ठाण्यात सून, मुलाचा दबाव; मृत्युपत्रपेक्षा बक्षीसपत्राद्वारे हडपताहेत मालमत्ता

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 4, 2024 02:21 PM2024-03-04T14:21:24+5:302024-03-04T14:21:42+5:30

नौपाड्यातील दोन कोटींच्या फ्लॅटवर निर्मलाताईंच्या सुनेचा डोळा असल्याचे त्यांनी हेरले. 

mother, write a flat of two crores in the award letter; Daughter-in-law in Thane, pressure from son; Assets are usurped by gift deed rather than by will | ए आई, दोन कोटींचा फ्लॅट बक्षीसपत्रात लिहून दे; ठाण्यात सून, मुलाचा दबाव; मृत्युपत्रपेक्षा बक्षीसपत्राद्वारे हडपताहेत मालमत्ता

प्रतिकात्मक फोटो...

ठाणे : नौपाड्यातील निर्मलाताई यांच्या पतीचे निधन झाले. लागलीच त्यांचा मुलगा व सून बंगळुरूवरून आले. वडील जाऊन जेमतेम तेरा दिवस होत नाहीत तोच सून सासूवर बक्षीसपत्र लिहून घेण्याकरिता दबाव टाकू लागली. नौपाड्यातील दोन कोटींच्या फ्लॅटवर निर्मलाताईंच्या सुनेचा डोळा असल्याचे त्यांनी हेरले. 

सुरुवातीला त्यांनी बराच विरोध केला. अखेर त्यांनी बक्षीसपत्राद्वारे फ्लॅट मुलगा व सुनेच्या नावावर केला. ज्या आईवडिलांनी लहानाचे मोठे केले, त्यांच्यावर इच्छापत्रापेक्षा बक्षीसपत्र लिहून देण्याकरिता मुले, मुली दबाव टाकू लागले आहेत. त्यातही वडिलांपेक्षा एकाकी पडलेल्या आईच्या बाबतीत असे प्रसंग झपाट्याने होताना दिसत आहेत. सून आणि मुलाकडून शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ होतोय, बक्षीसपत्र नावावर लिहून घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे, अशी व्यथा मांडत ज्येष्ठ नागरिक कायदेविषयक सल्लागार केंद्रात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीच्या वतीने हे सल्लागार केंद्र सुरू केले आहे. 

घरातील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुले, सुना यांच्यामध्ये मालमत्तेवरून वाद होत आहेत. पती किंवा पत्नीचा मृत्यू झाला, तर वारसा हक्क कोणाला मिळतो याची माहिती विचारत ज्येष्ठ नागरिक येतात. आमच्यावर बक्षीसपत्र लिहून घेण्यासाठी दबाव येत असल्याच्या तक्रारी येत ते करतात, असे कायदेविषयक सल्लागार ॲड. प्रमोद ढोबळे यांनी सांगितले. 

मानसिकदृष्ट्या खचतात
सल्लागार केंद्रात ३० टक्के वृद्ध हे इच्छापत्राकरिता, तर ७० टक्के ज्येष्ठ  बक्षीसपत्र लिहून घेण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगत असल्याचे ॲड. ढोबळे यांनी सांगितले. आईवडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीला जास्त त्रास होतो. कारण, त्याचा आधार हरवलेला असतो. त्यात घरातून होणाऱ्या दबावामुळे हे ज्येष्ठ नागरिक मानसिकदृष्ट्या खचून जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी सांगितले. 

राहते घर मुलाकडे गेले, बेघर होण्याची भीती व्यक्त करीत येतात. अलीकडच्या काळात बक्षीसपत्र लिहून घेण्यासाठी मुख्यत्वे सून तसेच काही प्रकरणात मुलाकडून दबाव टाकला जातो. हे प्रमाण वाढत आहे.
- ॲड. प्रमोद ढोबळे, कायदेविषयक सल्लागार, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती

जबरदस्तीने शेवटची इच्छा लिहून घेणे किंवा बक्षीसपत्र तयार करून घेणे, हे कायद्याला धरून नाही. यातील चांगली बाब एकच आहे की, अनेक वृद्धांना मृत्युपत्र, बक्षीसपत्रातील फरकाबाबत माहिती आहे.
- विनोद वाघ, कायदे अभ्यासक
 

 

Web Title: mother, write a flat of two crores in the award letter; Daughter-in-law in Thane, pressure from son; Assets are usurped by gift deed rather than by will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे