आईच्या माराचा धाक : कल्याणचा सौरभ सापडला ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:36 AM2017-08-05T02:36:00+5:302017-08-05T02:36:02+5:30
न सांगता मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या सौरभने (नाव बदलले आहे) हा प्रकार आईला समजल्यावर ती मारेल, या भीतीने घरातून पळ काढला. मात्र, आता तो ठाणे पोलिसांमुळे पुन्हा घरी परतला आहे.
ठाणे : न सांगता मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या सौरभने (नाव बदलले आहे) हा प्रकार आईला समजल्यावर ती मारेल, या भीतीने घरातून पळ काढला. मात्र, आता तो ठाणे पोलिसांमुळे पुन्हा घरी परतला आहे. कल्याणनजीकच्या अरवलीगावाचे नाव उच्चारताना तो ऐरोलीगाव असे करत असल्याने पोलिसांना त्याच्या घराचा पत्ता शोधण्यात अडथळा आला होता. मात्र, त्याच्यावरही मात करून दोनतीन दिवसांत त्या मायलेकाची पुनर्भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पितृछत्र हरपलेला सौरभ हा आई आणि मोठ्या बहिणीसह कल्याण, अरवलीगाव येथे राहतो. त्याची आई बिगारी काम करून त्या दोघा मुलांचे पालनपोषण करत आहे. ११ वर्षीय सौरभ हा इयत्ता सहावीत शिकत आहे. ३१ जुलै रोजी तो मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला. तेथे मासे पकडून झाले. मात्र, आपण आईला न सांगता आल्यामुळे आता घरी परत गेल्यानंतर आईचा मार खावा लागेल, अशी भीती सौरभला वाटली. त्यामुळे तो मासे तेथेच टाकून कोणालाही काही न सांगता पायी थेट कल्याण रेल्वे स्थानकात आला. तेथे फिरत असताना तो समतोल फाउंडेशन या लहान मुलांसाठी काम करणाºया संस्थेच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आला. तेथून त्याची रवानगी ठाण्यातील संस्थेत झाली.
याची माहिती ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला समजल्यावर पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, पोलीस उपनिरीक्षक ए.एस. चौरे आणि वाय.एस. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. चौकशीत सौरभ याने आपण टाटा पॉवर हाउस, ऐरोलीगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार, तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल आहे का, याची चाचपणी केली. मात्र, तशी तक्रार नसल्याचे नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. पुन्हा, त्याची विचारपूस केल्यावर त्याने हिंदी हायस्कू ल आणि घरापासून रेल्वेस्थानक पाऊण तासावर असल्याचे सांगितले. त्यानुसार, टाटा पॉवर हाउस कुठे आहे, याचा शोध घेतल्यावर कल्याण येथे चौकशी केली. त्या वेळी त्याची ओळख पुढे आली. त्याच्या घराचा पत्ता शोधण्यात मानपाडा पोलिसांची मदत झाली. अशा प्रकारे त्या मायलेकाची पुनर्भेट झाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
अवघ्या चारच दिवसांत ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने या मुलाची आईशी भेट घडवून आणली. या स्तुत्य कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरातून पळून गेलेली किंवा हरवलेल्या अशा अनेक मुलांना ठाणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत आपापल्या घरी सुखरूप पोहोचवले आहे.