मुलाच्या आग्रहाने मातेने जिंकली तीन पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:22 AM2018-10-21T03:22:58+5:302018-10-21T03:23:05+5:30
मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला.
ठाणे : मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला. तसेच या दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकली आहेत. श्रुतिका महाडिक यांनी आपल्या मुलाच्या आग्रहास्तव आंतरराष्टÑीय स्पर्धेत सहभागी होऊन वेगवेगळी तीन पदके जिंकल्याचे ठाण्यात शुक्रवारी झालेल्या एका परिषदेत त्यांनी सांगितले.
राज्य गुप्तवार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महाडिक या राष्ट्रीयस्तरावरच्या ज्युदोपटू आहेत. तसेच २००२ मध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. मात्र, २००८ पासून त्यांनी खेळाला रामराम ठोकला होता. पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पोलीस दलातील नोकरी सांभाळून आपल्या मुलाच्या संगोपनाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्यांचे खेळाशी नाते तुटले होते. याचदरम्यान आठ वर्षांचा मुलगा अमोघ याला त्यांनी मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत माहिती दिली. वयाची तिशी ओलांडलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यावेळी त्याने आपल्या आईला म्हणजेच श्रुतिका यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला. त्याच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या स्पर्धेत त्यातील उंचउडी प्रकारात सुवर्ण, १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य आणि तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदक मिळवले. तर, पायाला दुखापत झाल्याने त्यांना जलद चालण्याच्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे ते एक पदक हुकले. मात्र, त्या स्पर्धेतील क्रीडा प्रकारात ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनीता औसेकर-दिगुले यांनी सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकले.