मोटार सायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक, सहा मोटार सायकल जप्त
By नितीन पंडित | Updated: December 21, 2023 21:14 IST2023-12-21T21:13:40+5:302023-12-21T21:14:22+5:30
शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात नारपोली पोलिसांनी तिघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मोटार सायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक, सहा मोटार सायकल जप्त
भिवंडी: शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात नारपोली पोलिसांनी तिघा मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून दीड लाख रुपये किमतीच्या सहा मोटार सायकल हस्तगत करण्यात यश मिळविले असल्याची माहिती गुरुवारी दिली आहे.
८ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून श्रीकांत विजय दुडका यांची मोटर सायकल चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना नारपोली पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारामार्फत मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलिस उप निरीक्षक रोहन शेलार, पोलिस पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी एस नवले, पोलिस राजेश पाटील,राजेंद्र सांबरे,अनिल पाटील, ठाकरे, प्रविण शिंदे, श्रीधर हुंडेकरी, जाधव, योगेश क्षिरसागर, बंडगर यांनी, शांतीनगर परिसरातील नूर मोहम्मद रईस अहमद शाह वय २२ वर्षे या संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
या चौकशीत त्याने त्याचे साथीदार इम्तीयाज शाकीर शाह, वय १९ वर्षे व हारून आलम सहीद अहमद अंन्सारी, वय १९ वर्षे यांना ताब्यात घेत, या तिघा जणांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नारपोली पोलिस ठाण्यात दाखल एकूण सहा मोटर सायकल चोरीची कबुली दिली. या तिघा आरोपींना सध्या पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असून त्यांच्याकडून अजून काही मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.