मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:44 AM2020-01-03T04:44:06+5:302020-01-03T04:44:30+5:30
ठाकुर्ली स्थानकातील घटना
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली स्थानकात मोटरमन ए. आर. वर्मा आणि गार्ड पी. सी. पेडेकर यांनी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविले. १ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वर्मा यांनी याआधी डोंबिवली येथे जखमी अवस्थेत रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविले होते. त्यामुळे त्यांचा मध्य रेल्वे प्रशासनाने सन्मान केला.
मध्य रेल्वे मार्गावर बुधवार, १ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास ठाकुर्ली स्थानकात कल्याण दिशेकडील लोकल आली. ही लोकल जलद मार्गावरून जात होती. मात्र या वेळी रेल्वे रुळावर एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे मोटरमन वर्मा यांच्या लक्षात आले. वर्मा यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपत्कालीन ब्रेकद्वारे लोकल थांबविली. त्यानंतर तातडीने या दुर्घटनेची माहिती संबंधित विभागाला दिली. गार्ड आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची मदत घेतली.
मोटरमन ए. आर. वर्मा यांनी गार्ड पेडेकर यांच्या व अन्य जवानांच्या मदतीने जखमी प्रवाशाला फलाटावर आणले. कार्तिक सिंह (३५) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो दिवा येथील रहिवासी आहे. त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्मा यांच्या प्रसंगावधानामुळे सिंह याला जीवनदान मिळाले.
याआधी २३ डिसेंबरला वर्मा यांनी डोंबिवली स्थानकात रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविले होते. वर्मा यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक करीत मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी त्यांचा सन्मान केला.
प्रवाशाने हात गमावला
आंबिवलीहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास कार्तिक सिंह प्रवास करीत होता. तो लोकलच्या दरवाजावर उभा होता.
लोकल ठाकुर्ली-डोंबिवलीदरम्यान आली असता, लोकलच्या खांबाला धरून उभ्या असलेल्या कार्तिकचा हात सटकला आणि तो रेल्वे रुळावर पडला. त्याच्यावर डोंबिवली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाल्याने हात कापण्यात येणार आहे. कार्तिक झवेरी बाजार येथील ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर आहे, अशी माहिती कार्तिकचा भाऊ निर्मल साहू यांनी दिली.