माउंट एव्हरेस्ट उतरताना गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:52 AM2019-05-24T04:52:48+5:302019-05-24T04:52:55+5:30
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर, खाली उतरताना प्रकृती ढासळल्याने भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला.
मुंबई/ठाणे : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर, खाली उतरताना प्रकृती ढासळल्याने भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. मूळच्या मुंबईच्या असलेल्या ५४ वर्षीय अंजली यांनी पती शरद कुलकर्णी यांच्यासह एव्हरेस्टवर बुधवारी यशस्वी चढाई केली, परंतु उतरताना त्यांना श्वसनाचा त्रास झाला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हवामान स्वच्छ होते, त्यामुळे अनेक गिर्यारोहकांनी एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्यास सुरुवात केली. यामुळे मार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती कुलकर्णी यांच्या मोहीम आयोजक अरुण टेÑक्सने दिली. दरम्यान, अंजली यांच्यासह डोनाल्ड लिन या अमेरिकन गिर्यारोहकाचाही मृत्यू झाला.
थुप्डेन शेर्पा यांनी माहिती दिली की, ‘अंजली यांनी पती शरद यांच्यासह माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली. मात्र, खाली उतरताना त्यांचे निधन झाले.’ रवींद्र कुमार यांच्या नेतृत्वात चढाई केलेल्या कुलकर्णी यांच्या चमूमध्ये एकूण ६ गिर्यारोहकांचा समावेश होता.
अंजली यांच्या चढाईची शंका?
विविध वृत्तसंस्थावर अंजली यांचा अपघात एव्हरेस्ट उतरताना झाल्याचे सांगण्यात आले, पण गिरीप्रेमी उमेश झिरपे यांनी, ‘अंजली यांचा अपघात एव्हरेस्ट चढाई करताना झाला,’ अशी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘चढाई करताना कॅप ४ बाल्कनी येथे श्वसनाचा त्रास झाल्याने अंजली यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वेळी नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले. शिवाय, आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झाले. या वेळी नाशिकचे हितेंद्र व महेंद्र हे महाजन बंधूही चढाई करत होते. महेंद्र यांना स्नो ब्लाइंडचा तर हितेंद्र यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने दोघांना रात्री बेस कॅम्पवर आणण्यात आले.’