मोरबे धरणाला गळती सुरूच, पाटबंधारे विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:54 AM2018-03-12T06:54:45+5:302018-03-12T06:54:45+5:30

: पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.

 Mourbe dam starts the leak, ignore the repair of the irrigation department | मोरबे धरणाला गळती सुरूच, पाटबंधारे विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

मोरबे धरणाला गळती सुरूच, पाटबंधारे विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

Next

- मयूर तांबडे
पनवेल : पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या दगडी भिंतीला तडे गेल्यामुळे पाणीगळती सुरू आहे. मात्र तरीही धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मार्च महिना सुरू असला तरी पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर पाणी वाचवा, पाणी जिरवा अशी कितीही ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र पनवेल परिसरात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. पाटबंधारे खात्याच्या मोरबे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील डागडुजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
तालुक्यातील खैरवाडी-गारमाळ परिसरातील मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर व्यापले आहे. धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुबार पीक घेता येणे शक्य होते. मोरबे धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे, येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांतील नागरिक पिण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग करतात. धरणाची क्षमता ३.२२ दशलक्ष घनमीटर असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो.
तालुक्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून जवळपास दोन ते तीन वर्षापासून नियमितपणे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पनवेल महापालिकेसाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग करण्यात यावा असे देखील सुचविण्यात आले असल्याचे समजते. मात्र या धरणाच्या दुरु स्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

आमदारांचाही पाठपुरावा

जल अमृत योजना मंजूर होवून त्यातून पनवेलकरांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी नुकतीच नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली होती.


पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई सुरू आहे. उन्हाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मोरबे धरणाची डागडुजी करून ते पाणी वापरात आणणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिकेतील लोकप्रतिनिधींकडून याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

सध्या पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा वेळी मोरबे धरणातील पाणी ग्रामस्थांना मिळाले तर त्यांची वणवण थांबेल. धरणातील गळती थांबण्यासाठी पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर डागडुजी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार केला आहे.
- नीलेश बाविस्कर, पाणीपुरवठा सभापती, पनवेल महापालिका

Web Title:  Mourbe dam starts the leak, ignore the repair of the irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.