उत्तनचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवा
By admin | Published: March 5, 2016 01:26 AM2016-03-05T01:26:51+5:302016-03-05T01:26:51+5:30
शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.
भार्इंदर : शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.
शिष्टमंडळात नगरसेवक बर्नड डिमेलो, नगरसेविका शर्मिला बगाजी, हेलन जॉर्जी, लिओ कोलासो, रेनॉल्ड बेचरी, विल्यम गोविंद जॉर्जी, अॅलन बोर्जीस यांचा समावेश होता. पालिकेने २००८ मध्ये उत्तनच्या धावगी-डोंगरी येथे बीओटी तत्त्वावर कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्या वेळी स्थानिकांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तेथील धर्मगुरूंसह स्थानिक नेत्यांनी हा प्रकल्प लवकरच अन्यत्र स्थलांतर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु, हा प्रकल्प आजही तेथेच सुरू आहे. तेथील प्रकल्प बंद पडल्याने कचरा उघड्यावर टाकला जात आहे. दरम्यानच्या काळात तो वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केल्यानंतर ती जागा वन विभागांतर्गत असल्याने वन विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच या प्रकल्पास सकवार ग्रामस्थांनीही विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालिकेने एमएमआरडीएमार्फत तळोजा येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पात समाविष्ट होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उत्तन येथील डम्पिंग ग्राउंड सुरूच राहिल्याने त्याच्या स्थलांतरासाठी ग्रामस्थांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून १० वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावर प्रशासनाकडून प्रकल्प स्थलांतराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगून स्थानिकांचा विरोध थोपवला जात आहे. त्यातच, सकवार येथील नियोजित प्रकल्पही वन विभागाच्या लालफितीत अडकल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकल्पाचा अभ्यास करणाऱ्या आयआयटीच्या अहवालानुसार कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सूचना पालिकेला केली आहे. डम्पिंग ग्राउंडच स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी उत्तनच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेत शहरातील कचरा उत्तन येथे टाकण्यास विरोध दर्शविला. नागरिकांचा विरोध शमवण्यासाठी प्रशासनाने येत्या दोन महिन्यांत येथील कचऱ्यावर प्रभावी प्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)