बेकायदा बांधकामावरील कारवाईत चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:58 PM2018-03-22T17:58:59+5:302018-03-22T17:58:59+5:30
डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई मालती, पत्नी धनश्री हे देखील होते.
डोंबिवली: बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मंदिराच्या बांधकामावर कारवाई करण्यात चालढकलपणा सुरू असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी गुरूवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभाग अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई मालती, पत्नी धनश्री हे देखील होते.
येथील पुर्वेकडील मानपाडा रोडवर उभारण्यात आलेल्या मंदिराचे बांधकाम हे बेकायदेशीर असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निंबाळकर हे गेल्या तीन वर्षापासून केडीएमसीकडे सातत्याने करीत आहेत. कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी यापुर्वी आंदोलनेही छेडली आहेत. बेकायदेशीर मंदिरा विरोधात आवाज उठविला म्हणुन मागील वर्षी २२ मार्चला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आजवर चार आरोपी पकडण्यात आले आहेत तर अन्य चौघे आरोपी आणि मुख्य सुत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अन्य आरोपी अटक का केले जात नाही तसेच संबंधित बांधकामावर कारवाई का होत नाही याबाबत निंबाळकरांनी रामनगर पोलिसांसह केडीएमसीला आंदोलनाचे पत्र दिले होते. यावर गुरूवारी सकाळीच डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी निंबाळकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून कारवाई सुरू असल्याची माहीती दिली. वाडेकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पोलिस ठाण्यातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय निंबाळकरांनी घेतला. त्यानंतर दुपारी तीन वाजता निंबाळकर यांनी केडीएमसी विभागीय कार्यालय गाठले. ते फ प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडीत यांच्या दालनात गेले असता तेथे कोणीही उपस्थित नव्हते. आंदोलनाचे पत्र देऊनही चर्चेसाठी अधिकारी उपस्थित राहत नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत कार्यालयातच अर्धनग्न अवस्थेत धरणे आंदोलन छेडले. माझ्यावर झालेल्या हल्ल्याला वर्षाचा कालावधी लोटला पण आजही त्या बांधकामावर कारवाई होत नाहीये. मी मेल्यावरच कारवाई होणार का? असा सवाल निंबाळकरांनी यावेळी केला. गरीबाला कोणीही वाली नाही अशा शब्दात त्यांच्या आई मालती यांनीही प्रशासनाच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित मंदिर हे अधिकृत असल्याचे अधिका-यांकडून सांगितले जात होते. यावर पुरावे सादर करा अशी मागणी निंबाळकर यांनी केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.
आंदोलनाची आगाऊ कल्पना नाही
दरम्यान अचानक झालेल्या आंदोलनामुळे सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली. त्यांना आंदोलनाची पुर्वकल्पना प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. ज्यावेळी आंदोलनाला सुरूवात झाली त्यावेळी विभागीय कार्यालयात कोणीही वरीष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. अधिकारी न्यायालयीन कामकाजासाठी गेल्याची माहीती कर्मचा-यांकडून देण्यात आली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याबाबत पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.