भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीचे नोटाबंदीविरोधात आंदोलन
By admin | Published: January 10, 2017 06:32 AM2017-01-10T06:32:22+5:302017-01-10T06:32:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द केल्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कटली. ५० दिवसांच्या मुदतीनंतरही ती न
भार्इंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द केल्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कटली. ५० दिवसांच्या मुदतीनंतरही ती न सावरल्याने त्याविरोधात मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी गोल्डन नेस्ट सर्कल येथे आंदोलन केले.
बँकांद्वारे क्रेडिट आणि डेबिटकार्ड वापरापोटी अधिभार वसूल करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोलपंपचालकांनी कार्डाखेरीज रोखीने इंधन भरण्यास सुरुवात केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेसचे अपयश आहे. या कॅशलेस धोरणासह नोटाबंदीमुळे प्रत्यक्षात धनाढ्यांचा फायदा, तर सामान्यांचे नुकसान झाले. नोटाबंदीनंतर बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असह्य झाला. त्यात काही कर्मचारी दगावले. त्यांना अद्याप केंद्र तसेच राज्य सरकारने आर्थिक मदत दिलेली नाही. पुरेशा नोटांअभावी सामान्य कुटुंबातील विवाह सोहळे रद्द झाले. काहींनी ते पुढे ढकलले. ही विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी मोदींनी ५० दिवसांची मुदत दिली होती. ती संपुष्टात आल्यानंतरही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. यावरून मोदींचा नोटाबंदीचा निर्णय सपशेल फोल ठरला असून बँकांतील रोखीचे व्यवहार पुन्हा सुरू करावेत. त्यावरील निश्चित मर्यादा हटवण्यात यावी, या मागणीसह नोटाबंदीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्रा हसनाळे-शिंदे, गटनेते बर्नार्ड डिमेलो, प्रभाग सभापती आसीफ शेख, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, नगरसेविका वंदना पाटील, हेलन गोविंद जॉर्जी, अनिता पाटील, शिल्पा भावसार, प्रवक्ता प्रकाश नागणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)