Coronavirus: आशा स्वयंसेविकांचे राज्यभर कर्तव्य बजावताना काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:54 PM2020-05-12T14:54:35+5:302020-05-12T14:54:54+5:30
या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी अशा विविध मागण्या
ठाणे : कोरोनाच्या या संकट कालावधीत आरोग्य सेवेत मानधनावर राज्यभर कार्यरत असलेल्या स्वयंसेविकां व गटप्रवर्तक आदी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व जानेवारीपसून रखडलेले मानधन मिळवण्यासाठी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे तीन दिवशीय आंदोलन बुधवारी सायंकाळपर्यंत छेडण्यात येत आहे.
राज्यभर सुरु असलेले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष अँड. एम ए पाटील, सह निमंत्रक राजेश सिंह आणि राज्य आशा - गटप्रवरक संघाचे भगवान दवणे आदी पदाधिकारी करीत आहे. राज्यभरातील या आंदोलनात 100 टक्के कर्मचारी सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असतांना बहुतांशी ठिकाणी या आशा व गटप्रवर्तकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. काम करण्याचे प्रोत्साहन कमी होत असल्याची समस्या व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्यांनी या वेळी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, शासकीय आदेश प्रमाणे आशांना दोन हजार रुपये सप्टेंबरपासून त्वरित देण्यात यावे. गटप्रवर्तकांना अतिरिक्त निश्चित दहा हजारांचे मानधन मिळावे. शहरी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर राशी मार्च महिन्यापासून देण्यात यावी, या कर्मचाऱ्यांना 'कोव्हिड १९' पासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्व साहित्य देण्यात यावे, कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांचा कोणतेही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ५० लाख रुपयांचा बीमा राशी देण्यात यावी आदी मागण्या या तीन दिवशीय आंदोलनाद्वारे या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.