सफाई कामगारांचे आंदोलन
By admin | Published: July 2, 2017 06:06 AM2017-07-02T06:06:39+5:302017-07-02T06:06:39+5:30
ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी एकऐवजी दोन डबे वापरावे लागत असल्याने पगार दुप्पट करण्याची मागणी करत इमारतींमधील
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी एकऐवजी दोन डबे वापरावे लागत असल्याने पगार दुप्पट करण्याची मागणी करत इमारतींमधील सफाई कामगारांनी शनिवारपासून तीन दिवसांचे ‘झाडू बंद’ आंदोलन सुरू केले. यामुळे अनेक इमारतींतील रहिवाशांच्या घरातून कचरा गोळा झाला नाही. पालिकेच्या रोजच्या कचरा उचलण्याच्या प्रमाणात ३० टक्के घट झाली.
मीरा-भार्इंदरमध्ये निवासी इमारतींमध्ये दैनंदिन झाडू मारणे व घरांमधून कचरा गोळा करून तो इमारतीबाहेर ठेवण्याचे काम सफाई कामगार करत असतात. परंतु, महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती केल्याने आता ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन वेगवेगळे डबे या कामगारांना न्यावे लागतात. अनेक उंच इमारतींमध्ये लिफ्ट असली तरी डबे वर नेण्यास वा कचरा घेत खाली येण्यासाठी जिन्याचाच वापर करावा लागतो. अनेक ठिकाणी गोळा केलेला कचरा या कामगारांनाच वेगळा करायला लावला जातो, जेणेकरून कामाची वेळ साधारण चार तासांनी वाढली आहे. श्रमही वाढला आहे. आधीच किमान वेतनाप्रमाणे या कामगारांना पगार मिळत नाही. त्यातच काम दुपटीने वाढल्याने कामगारांना पगारही दुप्पट करण्याची मागणी श्रमिक एकता संघटनेने केली आहे.
संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना निवेदन देण्यात आले. पण, आयुक्तांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे संघटनेचे प्रमुख अंकुश मालुसरे यांनी सांगितले. आमच्या संघटनेचे १७०० सदस्य असून झाडूबंद आंदोलनामुळे शहरातील जवळपास सर्वच इमारतींमध्ये शनिवारी कचरा उचलण्यात आलेला नाही. सोमवारपर्यंत आमचे आंदोलन चालणार आहे, असे मालुसरे म्हणाले.
दरम्यान, शहरात जमावबंदी असल्याने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेला मागे घ्यावा लागला. सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे अनेक इमारतींमध्ये सफाई झालेली नाही तसेच घराघरांतून कचरा उचलला गेला नाही. काहींनी घरातील कचरा खाली नेऊन टाकला. उद्या रविवार असल्याने गृहनिर्माण संस्थांमधील समित्यांच्या बैठका घेऊन यातून तोडगा काढण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालिकेचा तूर्तास हस्तक्षेप नाही
हा प्रश्न रहिवासी व खाजगी सफाई कामगारांचा असल्याने त्यात तूर्तास तरी पालिकेने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.