परिवहन निवडणूक प्रक्रियेला मनसेचीही हरकत
By admin | Published: February 22, 2017 06:23 AM2017-02-22T06:23:13+5:302017-02-22T06:23:13+5:30
एकाही राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक
कल्याण : एकाही राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक हरकतींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी अवलंबल्या जाणाऱ्या गुप्त मतदान प्रक्रियेला मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी हरकत घेत ३१(अ) नियमानुसार प्रमाणशीर प्रतिनिधीत्वानुसार निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा गुप्त मतदान पद्धतीला आव्हान दिले जाईल, असा इशारा दिला आहे.
परवहन समितीच्या निवडणुकीच्या गुप्त मतदान पद्धतीला यापूर्वीच महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी हरकत घेतली आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधीत्वनुसार निवडणूक घेण्याची तरतूद केली असताना चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मात्र, समितीतील सहा सदस्यांच्या निवडीसाठी गुप्त मतदानाची प्रक्रियाच राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसेनेही त्याला विरोध केल्याने एकूणच प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेतील उपलब्ध संख्याबळानुसार, शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे समितीवर निवडून जाऊ शकतात. तर भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. आणखी एक सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी काही मतांची आवश्यकता आहे. शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने सदस्यांना संधी देताना डावलल्यांची नाराजीही ओढून घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत २० अर्जांचे वितरण झाले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. २८ तारखेला दुपारी २ वाजता होणाऱ्या विशेष महासभेत सहा सदस्यांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)