गणेशोत्सवाचे निर्बंध शिथिल करण्यासाठी गणेश मंडळांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:21+5:302021-07-07T04:50:21+5:30
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या विरोधात ठाण्यातील गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त करून मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन ...
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या विरोधात ठाण्यातील गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त करून मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमचा उत्सव आमची जबाबदारी असे सांगून या मंडळांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. यानंतर गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्य सरकाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्यानंतर प्रशासन व गणपती उत्सव मंडळ हे आमने सामने आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीच्या निर्बंधांवरून मंडळांमध्ये नाराजी आहे. तर प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे येणारे काळात प्रशासन व गणपती मंडळ यांच्यात सामना रंगलेला दिसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवामधील नियम शिथिल केले नाहीत तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ठाण्यातील गणोशोत्सव समितीने दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. ठाण्यात जवळपास २५० हून जास्त गणपती मंडळ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
आता कोरोनाचे सावट बऱ्यापैकी कमी झाले असून लसीकरण बऱ्यापैकी झाले आहे, तरीही गणेशोत्सवावर टाकलेले निर्बंध अन्यायकारक आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याचा फेरविचार करायला हवा, असे समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत म्हणाले.