आंदोलनाने मंदावला ठाणेकरांचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:27 AM2018-08-10T02:27:56+5:302018-08-10T02:28:17+5:30
सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या ९ आॅगस्टच्या बंदमध्ये ठाणे जिल्ह्याने सहभाग घेतला नसला तरी गुरुवारी जिल्ह्याचा वेग मात्र कमी झालेला दिसला.
ठाणे : सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या ९ आॅगस्टच्या बंदमध्ये ठाणे जिल्ह्याने सहभाग घेतला नसला तरी गुरुवारी जिल्ह्याचा वेग मात्र कमी झालेला दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मॉल, दुकाने सकाळच्या सत्रात बंद होती. रस्त्यावर वाहतूकही कमी होती.
सकल मराठा समाजाने सकाळी १० ते ११ या वेळेत शहरातील विविध सहा ठिकाणी २१ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सीमेवर वीरमरण पत्करलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनासुद्धा आदरांजली वाहण्यात आली. परंतु, तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सकल मराठा समाजाने शासनाचा निषेधही केला.
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नसल्याचे बुधवारीच सकल मराठा समाजाने स्पष्ट केले होते. समाजातील तणाव वाढू नये, म्हणून हा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुतात्म्यांना सकाळी १० ते ११ वा. या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा निषेध करण्यासाठी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अष्टविनायक चौक (कोपरी) , कळवानाका, वर्तकनगरनाका, वागळे प्रभाग समिती, सुरज वॉटर पार्क (वाघबीळ) या सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली वाहण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्ता रोको अथवा घोषणाबाजी करण्यात आली नाही.
>१६ आॅगस्ट रोजी पुन्हा आंदोलन केले जाणार असून त्याची दिशा लवकरच ठरवली जाईल, असेही सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु, २५ जुलै रोजी जो काही प्रकार झाला, त्यानंतर असा प्रकार होऊ नये, यासाठी मराठा समाजाच्या मंडळींनी काळजी घेतलेली दिसली. सकल मराठा समाजाने ज्या सहा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय, शहरातील मुख्य हायवे, मुख्य रस्ते, घोडबंदर भागातील रस्ते याठिकाणीही चोख बंदोबस्त तैनात होता.
तर, काही ठिकाणी ड्रोन कॅमेºयांची नजरसुद्धा ठेवण्यात आली होती. २५ जुलैसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास काय करायचे, अशी काहीशी भीतीही अनेकांच्या मनात होती. त्यामुळे शहरातील बहुसंख्य शाळांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर ज्या ठिकाणी परीक्षा सुरू होत्या, त्या ठिकाणी विद्यार्थी मात्र परीक्षेसाठी हजर होते. शहरातील महाविद्यालये सुरू असली तरीदेखील तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी कमी होती. रोज गजबजलेल्या रस्त्यांवर मात्र शुकशुकाट होता. वाहनांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. शहरातील मॉल सकाळच्या सत्रात बंद होते. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सुरळीत सुरू होती. परंतु, एकूणच बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक दुकानदारांनी, खाजगी आॅफिसेस, व्यावसायिक यांनी सकाळ सत्रात आपली सेवा बंद ठेवणे पसंत केल्याचे दिसले.
>मराठा आंदोलनामुळे एसटीच्या एक हजार फेºया रद्द; उत्पन्नावर परिणाम
मराठा समाजाच्या महाराष्टÑ बंदमधून मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईला वगळले असले, तरी राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागातून दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत एसटीच्या होणाºया एकूण १३९४ फेºयांपैकी एक हजार फेºया रद्द करण्यात आल्या. बंदमुळे नागरिकच बाहेर पडले नाहीत. त्यामुळे रिकाम्या बस धावण्यापेक्षा त्यांच्या फेºया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनादरम्यान कुठेही एसटी बसचे नुकसान झाले नाही. परंतु, फेºया रद्द केल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या ठाणे-कर्जत-कसारा मार्गांवरील लोकल नेहमीच उशिरा धावतात. गुरुवारी मात्र आंदोलन असतानाही या मार्गांवरील लोकल गाड्या वेळेवर धावत होत्या. बंदचा लोकलवर कोणताही परिणाम झाला नाही. एकही फेरी रद्द झाली नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.बंद असतानाही बससेवा सुरळीत ठेवण्यावर भर दिला होता. मात्र, बंदमुळे नागरिक घराबाहेर पडले नाही. त्यामुळे डेपोमध्ये गर्दी नव्हती. गरज असलेल्या मार्गावरील बसफेºया सुरू ठेवल्या होत्या. या बंदमुळे उत्पन्नावर परिणाम झाला. पण, कोणतेही नुकसान झाले नाही.’’
- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे राज्य परिवहन विभाग
>विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुटी
ठाणे महापालिकेने मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना गुरूवारी सुटी जाहीर केली होती. ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या चाचणी परीक्षा होत्या, त्या मात्र सुरू होत्या. काही मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षक उपस्थित होते. श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या शाळांना सुटी होती. इंग्रजी माध्यमांची चाचणी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी आले होते, असे श्रीरंग एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रमोद सावंत यांनी सांगितले. आज शाळेत एकही मुलगा नव्हता, पण सर्व शिक्षक उपस्थित असल्याचे सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांनी सांगितले. ज्ञानसाधना महाविद्यालयात २० टक्के मुले उपस्थित होती. महाविद्यालयात यायचे की नाही, हे विद्यार्थ्यांवरच सोडले होते, असे ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी सांगितले. आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात ४० टक्के उपस्थिती असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा हर्डीकर यांनी सांगितले. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेने सुटी जाहीर केल्याने शिक्षकही शाळेत आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
>‘बंद’ नसूनही ठाण्यास पोलीस छावणीचे स्वरूप
मुंबई आणि ठाणे जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्टÑभर मराठा मोर्चा समन्वयकांनी गुरुवारी बंदची हाक दिली होती. जुलै महिन्यातील आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे पोलिसांनी खबरदारी घेऊन ठाणे शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे ‘बंद’ नसतानाही शहरात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. यापुर्वीच्या आंदोलनादरम्यान ठाण्यात हिंसाचार झाला होता. तो अनुभव लक्षात घेता ठाण्यात राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या, सात पोलीस उपायुक्तांसह तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी हे शहरासह संपूर्ण आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी तैनात केले होते. याशिवाय, सात स्ट्रायकिंग फोर्स, दोन दंगल नियंत्रण पथकेही बंदोबस्तासाठी होती.सर्वाधिक बंदोबस्त ठाण्याच्या नितीन कंपनी चौकात, त्यापाठोपाठ तीनहातनाका आणि कॅडबरीनाका येथे तैनात होता. शिवाय, ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या सर्व सुट्याही रद्द केल्या होत्या. सुदैवाने, कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी बंदोबस्त विसर्जित झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.