एकीकरण समितीचे मराठीसाठी आंदोलन , मराठी बोला, नाहीतर महापौरपद सोडा; कामकाजही मराठीतूनच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:21 AM2017-10-17T06:21:13+5:302017-10-17T06:21:49+5:30
मीरा-भार्इंदरच्या महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिकेच्या कामकाजात करणार नसतील; तर त्यांनी महापौरपद सोडावे अशी मागणी करत सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिकेच्या कामकाजात करणार नसतील; तर त्यांनी महापौरपद सोडावे अशी मागणी करत सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. या आंदोलनात अन्य संघटना आणि पक्षांचे प्रतिनिधीही सहभागी झाले.
महासभेमुळे सकाळपासूनच हातात निषेधाचे फलक घेऊन समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, मीरा-भार्इंदरचे अध्यक्ष सचिन घरत, रेश्मा डोळस, प्रमोद पार्टे, विद्या बोधे, काजल चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक मीलन म्हात्रे, जनसंग्रामचे सुहास सावंत, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम, प्रदीप सामंत, गणेश दिघे, अजीम तांबोळी, समीर मालपाणी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
महापौर डिम्पल मेहता यांना मराठी बोलणे फारसे जमत नाही. शिवाय अनेक नगरसेवकही सर्रास मराठीचा वापर टाळतात आणि अन्य भाषांचा वापर करतात. शासन आदेशानुसार राजभाषा मराठीचा वापर कामकाजात केला पाहिजे. परंतु महापौरांसह अनेक नगरसेवकांना मराठी येतच नाही किंवा थोडेफार येत असल्याने त्यांच्याकडून राजभाषा मराठीचा अवमान होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. महासभा व अन्य सभा तसेच सर्व कामकाज मराठीतून व्हावे याचा आग्रह धरण्यासाठी समितीने आंदोलन केले.
आंदोलकांनी तोंडावर काळ््या पट्ट्या बांधल्या होत्या. ‘महासभेचे कामकाज मराठीत झालेच पाहिजे,’ ‘महापौरबाई मराठीत बोला, नाहीतर खुर्ची रिकामी करा,’ ‘मराठीचा अपमान सहन करणार नाही,’ आदी घोषणा लिहिलेले फलक आंदोलकांनी धरले होते. हे आंदोलन शांततेत पार पडले. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र व्हायला हवे. मराठी भाषेसाठी आंदोलन म्हणजे कोणाचा व्यक्तिगत द्वेष नाही, पण आपल्याच राज्यात आपली मराठी भाषा टिकावी, हेच आमचे ध्येय्य आहे. महापौरांनी स्वत: मराठी बोलून सर्वाना सभागृहात मराठी बोलण्यास भाग पाडावे, अन्यथा महापौरपद सोडावे अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
राज्य सरकारने लोकप्रतिनिधींना मराठी सक्तीची करावी अन्यथा निवडणूक लढवू देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. आताचे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत होते. पण यापुढे मराठी भाषेचा अपमान करणाºयांची गय केली जाणार नाही, उग्र आंदोलन केले जाईल, असे सरचिटणीस कृष्णा जाधव व उपाध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी सांगितले.
झेपेल तेवढी मराठी
भाजपाच्या महापौर डिम्पल मेहता यांची सोमवारी पहिलीच महासभा होती. डिम्पल यांनी कसेबसे मराठीतून सभागृहाचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. मधून त्या हिंदी बोलत होत्या; तर अनेक नगरसेवकही हिंदीतूनच बोलत होते. शिवसेनेच्या नगरसेविका तारा घरत यांनी महासभेत मराठीतून बोलण्याचा आग्रह धरला.