जुना रिक्षा स्टँड परत मिळविण्यासाठी शेअर रिक्षा चालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:57 PM2019-01-12T15:57:43+5:302019-01-12T16:00:40+5:30
नव्या रिक्षा स्टँडच्या ठिकाणीसुध्दा कमी जागा दिल्याने आणि वाहतुक पोलिसांकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीच्या विरोधात आज स्टेशन परिसरातील शेअर रिक्षा चालकांनी आंदोलन केले.
ठाणे - ठाणे स्टेशन भागात जुना शेअर रिक्षा स्टँड परत मिळावा म्हणून काही रिक्षा चालकांनी आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही रिक्षा चालकांना ताब्यातही घेतले. परंतु यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अशोक टॉकीज जवळील खालील बाजूस यापूर्वी कळवा, विटावा या भागांकडे जाणारा रिक्षा स्टँड होता. परंतु यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, तसेच या स्टँड बाबत वारंवार तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. तसेच हा मार्केट एरिया असल्याने येथेच रिक्ष लागल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होऊन जात होते. त्यामुळे मागील आठवड्यात वाहतुक पोलिसांनी येथील रिक्षा चालकांना अशोक टॉकीज समोरील जागा दिली. या ठिकाणी घोडबंदरकडे जाणाºया रिक्षांसाठी एक लेन देण्यात आली. तसेच कळवा, विटावासाठी एक लेन देण्यात आली. परंतु एका लेनमध्ये पाचच रिक्षा लावण्यास परवानगी देण्यात आली असल्याने आणखी एक लेन वाढविण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली होती. त्यानंतर आणखी तिसरी लेन वाढविण्यात आली. परंतु या लेनमध्येही पाच रिक्षा लावण्यास परवानगी देण्यात आली होती. असे असतांना शनिवारी पाच रिक्षांच्या मागेसुध्दा काही रिक्षा लागल्याने त्या हटविण्यात याव्या अशी समज वाहतुक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिली. परंतु ते न ऐकल्याने त्यांचा परवाना जप्त करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांना पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आंदोलन सुरु केल्या.
तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जुना रिक्षा स्टँड परत मिळावा यासाठीसुध्दा घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. आधी जुन्या स्टँड वरुन हटविण्यात आले आणि पुन्हा नव्या स्टँडवर सुध्दा अशा पध्दतीने वागणुक दिली जात आहे, शिवाय कारण नसतांना एका रिक्षा चालकाला मारल्याने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी संतप्त रिक्षा चालकांनी दिली. त्यामुळे जे पोलिसाने हात उगारला त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी रिक्षा चालकांनी केली.
पूर्वीच्या जागेवर तक्रारी होत्या, वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे त्यांना नवीन जागेत हलविण्यात आले आहे. परंतु याठिकाणी पाच रिक्षा लावण्याची परवानगी असतांनाही जास्तीच्या रिक्षा लागत होत्या. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.
(सुरेश लांभाते - वरीष्ठ पोलीस निरिक्षक, वाहतुक विभाग)