नोटाबंदीविरोधात कल्याणमध्ये आंदोलने
By admin | Published: January 10, 2017 06:27 AM2017-01-10T06:27:44+5:302017-01-10T06:27:44+5:30
नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसने येथील शिवाजी चौकात थाळीनाद केला.
कल्याण : नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसने येथील शिवाजी चौकात थाळीनाद केला. तसेच शिवाजी चौक ते तहसील कार्यालयादरम्यान मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेधही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयाबाहेर धरणे धरले.
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी कोणत्याही प्रकारे पूर्वनियोजन केले नाही. परिणामी लघुउद्योजक, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणारे यात पुरते भरडले गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेसने गुरुवारीही देशपातळीवर आंदोलनाची हाक दिली होती. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात शिवाजी चौकात थाळीनाद करण्यात आला. या आंदोलनाचा फटका वाहतुकीला बसल्याने अर्धा ते पाऊण तास वाहतूक पुरती खोळंबली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवत रस्ता मोकळा केला. या वेळी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. त्यानंतर, त्यांना सोडून दिले.
जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात कल्याण-डोंबिवली शहर महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अनुसूचित जाती कल्याण जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, माजी नगरसेवक
संतोष केणे, माजी शिक्षण मंडळ उपसभापती अमित म्हात्रे यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोमवारी राज्यव्यापी आंदोलन छेडले. कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे धरत नोटाबंदीचा निषेध केला. या वेळी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, जे.सी. कटारिया, उदय जाधव, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, युवराज पवार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)