मुंब्य्रात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:49 AM2021-09-09T04:49:02+5:302021-09-09T04:49:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : बेताची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाच्या पुढचे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : बेताची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाच्या पुढचे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहिले आहे. त्यांना ते पूर्ण करता यावे, यासाठी मुंब्य्रात कौसा भागातील एम.एम. व्हॅली परिसरातील ठामपाच्या शाळेतील इमारतीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय चालू करण्याच्या हालचाली विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी सुरू केल्या आहेत.
यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या वर्गखोल्यांची चाचपणी करण्यासाठी त्यांनी मंगळवारी शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी आयुक्तांना पत्र दिले असून अनंत चतुर्थी (गणेश विसर्जन झाल्यावर) नंतर या विषयावर संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण अधिकारी आणि अभियंत्यासह लवकरच पुन्हा एकदा शाळेला भेट देऊन येथील एकूण परिस्थितीचा तसेच इमारतीच्या क्षमतेचा अंदाज घेणार असल्याची माहिती पठाण यांनी दिली. येथे महाविद्यालय सुरू झाल्यास फीअभावी ज्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहिले आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्याच्याबरोबर राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.