डहाणूत नीरेपासून गूळनिर्मितीला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:33 PM2019-04-20T23:33:32+5:302019-04-20T23:33:48+5:30
खादी व ग्रामोद्योग विभागाचा उपक्रम, नागरिकांना प्रशिक्षण, महात्मा गांधींचा होता आशीर्वाद
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : तालुक्यातील आगर येथील गजानन नाईक बहुउद्योगीय प्रशिक्षण संस्था, केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाकडून चालविली जाते. येथे स्वातंत्र्यापूर्वीपासून नीरा संकलन व विक्र ी केली जाते. मात्र नुकतेच दोनशे स्थानिकांना प्रशिक्षण देऊन निरेपासून गूळनिर्मिती करून त्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्याचे धोरण या संस्थेने ठरविले असल्याने ताडगुळाची बाजारपेठ असा ठसा उमटविण्यास हे शहर सज्ज झाले आहे.
ताडगूळ उद्योगाअंतर्गत ग्रामीण नागरिकांना निरेपासून गूळनिर्मितीचे प्रशिक्षण देण्याकरिता क्षेत्रभेटी, जनजागृती अन्य संवाद पद्धतीचा प्रभावी वापर करून अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ताडी व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश अधिक असल्याने शंभर जोडप्यांची (पति-पत्नी) निवड केली. त्यांना २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत निरेपासून गुळ बनविण्याचे प्रशिक्षण सी. एस. सूर्यवंशी, विजय कडू, एल. एम. वरखंडे यांनी प्राचार्य विकास लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले. स्थानिक ताडी व्यावसायिकांना नीरा काढण्यास प्रवृत्त करून गूळ निर्मितीच्या व्यवसायात समावेश करून घ्यायचा हा त्यामागचा उद्देश प्राचार्यांनी बोलून दाखवला. २०० प्रशिक्षणार्थ्यांना आठ गटात विभागून प्रत्येक गटाला १० लीटर नीरा देण्यात आला. गॅस अथवा लाकडाच्या वापराने भट्टी पेटवून कढईतील द्रावणाला दीड ते दोन तास उकळवल्यावर तयार झालेले घट्ट द्रावण लाकडाच्या साच्यात ओतल्यावर ३०० ग्रॅम वजनाच्या गुळाच्या वड्या बनल्या त्या १ किलो झाल्या.
डहाणूत स्वातंत्र्यापूर्वी गजानन नाईक यांनी नीरा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. सध्या खादी ग्रामोद्योगाकडून नीरा संकलन व विक्री केली जाते. निरेपासून गूळनिर्मिती व विक्र ीला भरघोस प्रतिसाद लाभल्याने प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून स्थानिक ताडी व्यावसायिक व नागरिकांचा या व्यवसायाकडे वळतील.
-विकास लाडे, प्राचार्य, गजानन नाईक बहुउद्योगीय प्रशिक्षण केंद्र,
खादी ग्रामोद्याग आयोग आगर
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार केंद्राकडून कर्ज
स्थानिक बाजारा प्रमाणेच मुंबई आणि अन्य शहरात त्याला मोठी मागणी असून आॅनलाईन ग्राहक सर्वाधिक असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले. या व्यवसायाकरिता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना पंतप्रधान ग्रामीण रोजगार योजनेतून कर्ज पुरवठयाची सोय आहे. शिवाय त्यांना कढई, एलपीजी बर्नर, साचे (दोन नग) आदी साहित्य विनामूल्य दिले आहे. त्यांनी उत्पादित केलेला सर्व गूळ स्वीकारण्याची हमी या संस्थेकडून देण्यात आली आहे. शिवाय स्वत: ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याचीही मुभा आहे.