भारताची व्यसनाधीनतेकडे वाटचाल
By Admin | Published: January 11, 2017 07:06 AM2017-01-11T07:06:58+5:302017-01-11T07:06:58+5:30
भारत महासत्ता होऊ पाहत आहे. येत्या काळात सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल. मात्र, या देशाला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे
डोंबिवली : भारत महासत्ता होऊ पाहत आहे. येत्या काळात सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल. मात्र, या देशाला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे. त्यामुळे २०२० मध्ये जगातील सर्वाधिक व्यसनी देश भारत असेल. महासत्तेकडे जाण्यासाठी हा मोठा अडथळा असेल, असा धोका भागवताचार्य योगेश्वर उपासनी यांनी दिला. डोंबिवली कीर्तनकुल संस्था- डोंबिवली आणि मराठा हितवर्धक मंडळ- डोंबिवली यांच्यातर्फे देवर्षीनारद कीर्तन महोत्सव रविवारपासून मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर कीर्तनकुल संस्थेचे अध्यक्ष सुहासबुवा सरपोतदार, भागवताचार्य अलका मुतालिक, मराठा हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्रीराम चाळके, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपासनी बोलत होते.
ते म्हणाले की, पुढच्या पिढीतील मुले उत्तम श्रवण कधी क रू शकतील का? त्यांना कीर्तनाकडे वळवण्यासाठी आम्ही कमी पडतो. मुलांचे नाते देशाशी, धर्माशी आणि संस्कृतीशी अधिक घट्ट करायला हवे आहे. नाहीतर, आमची मुले आम्हाला सांभाळत नाही, हे बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. हा सिंहावलोकनाचा काळ आहे. आता जागे झालो नाही, तर मरणापूर्वीचे सोहळे आताच साजरे करावे लागतील. हे धर्मयुद्ध आहे. त्यामुळे समाजापर्यंत पोहोचेल, असे उत्तम कार्य करूया. कीर्तनातून अनेकांना तारले जाते आणि ती जबाबदारी विश्वरूपी संतांनी आमच्यावर दिली आहे. या अलौकिक विभूतीचे आम्ही पायिक आहोत. या ठिकाणी नामजपयज्ञ व राष्ट्रधर्मयज्ञ सुरू होणार आहे. त्यातून देश, राष्ट्र व धर्माला नवी झळाळी देऊया, असेही त्यांनी सांगितले.
मुतालिक म्हणाल्या की, कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी शैक्षणिक संस्था काही कारणाने बंद करावी लागली. पण, त्यावेळी या परीक्षेत डोंबिवलीतील विद्यार्थी उत्तम यश मिळवीत असत. श्रोते आणि माणसे वाढवणे हे सोपे काम आहे. पण, कार्यकर्ता तयार करण्यास एक तप मेहनत घ्यावी लागते. सर्व कीर्तनकारांनी येथे येण्याची गरज आहे. त्यांना शक्य होत नसले तरी, ते आपल्या परीने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. व्यक्ती कोणत्याही संप्रदायाची असू द्या. तिच्यामध्ये माणुसकी हा धर्म असला पाहिजे. माणुसकीला कोणताही संप्रदाय नाही. प्रत्येक व्यक्तीने जीवनात प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)