खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दणक्यानंतर पालिकेने केले कल्याण- मलंगगड रस्त्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:34 PM2017-09-28T17:34:12+5:302017-09-28T17:34:33+5:30
रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
कल्याण - रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. खा. डॉ. शिंदे यांनी काल, बुधवारी या रस्त्याला अचानक भेट दिली असता अनेक प्रकारची अनियमितता आढळली होती. तसेच आश्वासन देऊनही खड्डे भरण्याचे काम नीट होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांना फैलावर घेतल्यानंतर आजपासून कामाला योग्य प्रकारे सुरुवात करण्यात आली.
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खा. डॉ. शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी कल्याण-मलंग रस्त्याला भेट देऊन निकृष्ट पद्धतीने होणारे काम थांबवले होते. काल बुधवारी पुन्हा त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली. प्रत्येक्षात कामच सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले होते. याबत त्यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदार याना चांगलेच फैलावर घेतले होते.
या रस्त्याच्या कामाच्या पाहणी दरम्यान विकासक, व्यावसायिक व महापालिकेचे अधिकारी यांची अभद्र युती समोर आली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी प्रस्तावाप्रमाणे रस्त्याची रुंदी न घेता अनेक विकासकांची अनधिकृत बांधकामे व अनेक व्यावसायिकांची अनधिकृत दुकाने यावर कारवाई होऊ नये म्हणून मोजमापच चुकीचे केले असल्याचे पाहणीत उघड झाले होते. या सर्वांचा मनस्ताप हा येथील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी खा. डॉ.शिंदे यांच्यासमोर मांडल्या. यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन अनधिकृत बांधकामांवर करवाई करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर त्वरित कडक कारवाई व त्यांना निलंबित करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर आज रोजी लगेचच सदर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हा येथील नागरिकांचा विजय आहे. नागरिकांना चांगल्या सोयी- सुविधा मिळाव्यात, यासाठी चुकीच्या गोष्टींविरोधात मी सतत नागरिकांसोबत असणारच, असे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.