वारली चित्रकलेची भेट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:08 PM2018-12-19T18:08:57+5:302018-12-19T18:10:40+5:30
कल्याणमध्ये मेट्रो आणि सिडकोच्या ९५ हजार घरांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार कपिल पाटील यांनी अनोखी व नाविन्यपूर्ण भेट दिली.
डोंबिवली: कल्याणमध्ये मेट्रो आणि सिडकोच्या ९५ हजार घरांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार कपिल पाटील यांनी अनोखी व नाविन्यपूर्ण भेट दिली. ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासींनी जगभरात पोचविलेल्या वारली चित्रकलेची भेट पाहून पंतप्रधानही भारावले, कलेला मोल नाही असे म्हणाल्याचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. मात्र, पंतप्रधान म्हणून ते प्रथमच कल्याणला आले. कल्याणच्या इतिहासात काही वर्षांत प्रथमच पंतप्रधानांनी भेट दिली.
त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वागताचा भाजपसह सामान्य नागरिकांमध्येही उत्साह होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून काय द्यावे, यासंदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यात मेट्रोचे प्रतिक वा कल्याणचे वैशिष्ट्य दाखविणारे प्रतिक द्यावे, असा काहींचा मानस होता, त्याचवेळी खासदार कपिल पाटील यांनी वारली चित्र देण्याची कल्पना मांडली. त्याला सगळयांची तात्काळ पसंती मिळाली. ठाणे व पालघरमधील डोंगराळ भागात मूळ रहिवाशी हा आदिवासी समाज आहे. या समाजाचे वैशिष्टय असलेली वारली चित्रकला जगभरात पोचली. पुरेशी साधने नसतानाही काढण्यात आलेल्या वारली चित्रांना रसिकांची चांगली पसंती मिळाली. पंतप्रधानांना ती चित्रे भेट देण्याचे ठरले. त्यानूसार खास पंतप्रधानांसाठी वारलीचे चित्र काढून घेण्यात आले, ती भेट देताच वारली चित्रकलेची ख्याती जगात आहे, निश्चितच कलेला मोल नसल्याची दाद त्यांनी दिली.