खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:45 PM2022-01-04T17:45:24+5:302022-01-04T17:46:14+5:30
MP Rajan Vichare and MLA Pratap Sarnaik tests COVID-19 positive : दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
ठाणे : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे कोरोना बाधित झाले असताना आता ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि ओवळा - माजिवडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील मंत्र्यांना आणि काही आमदारांना कोरोनाची लागण झाली असतानाच आता खासदार राजन विचारे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. विचारे हे देखील सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समवेत न्हावा शिवा येथे पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना काळात मागील दोन वर्षापासून विविध प्रकारे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या संपर्कात असून देखील आई जगदंबेच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे, काळजी नसावी परंतु मी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मागील दोन ते तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी व आपली तसेच परिवाराची काळजी घ्यावी. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातून लवकर बाहेर पडेन, असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणो जाणवल्यानंतर माझी कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्याने मी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहे, असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करुन घ्यावी तसेच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.