राजन विचारेंची विचारपूर्वक खेळी?; जमलेल्या गर्दीला हात दाखवत मारला मौके पे चौका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 03:38 PM2022-08-27T15:38:01+5:302022-08-27T15:38:09+5:30
आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस राजन विचारे यांनी अभिवादन केले.
ठाणे- ठाण्यातील शक्तिस्थळावर स्व. आनंद दिघे यांना अभिवादन करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून सकाळी साडेदहा वाजल्यापासून कार्यकर्ते वाट पाहत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक साहेब आले. साहेब आले... अशी आरोळी कुणीतरी ठोकताच पेंगुळलेले कार्यकर्ते विजेचा शॉक लागल्यासारखे उभे राहिले.
शिंदे यांची छबी आपल्या कॅमेरात टिपण्याकरिता अनेकांनी मोबाईल बाहेर काढले. अनेकजण खुर्च्या सोडून पुढे धावले. मीडियाचे प्रतिनिधीही सावधान झाले. 'अमर रहे.. अमर रहे... दिघे साहेब अमर रहे' अशा घोषणांनी शक्तिस्थळ दणाणून सोडले, मात्र, अगदी काही क्षणांतच अनेकांनी हातातील मोबाइल फोन खिशात घातले. सोडलेल्या खुर्च्या परत ताब्यात घेण्याकरिता माघारी फिरले. घोषणाबाजीही झटपट म्युट झाली. कारण दिघेंना अभिवादन करण्यासाठी एकनाथ शिंदे नव्हे तर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी हजेरी लावली होती.
विचारे यांच्या या 'विचारपूर्वक खेळी'ची चर्चा सुरू आहे. यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिघे यांना अभिवादन करण्याकरिता शिंदे येण्यापूर्वी शिंदे यांच्याकरिता जमलेल्या हजारो कार्यकत्यांमध्ये जाऊन विचारे यांनी दिघे यांना अभिवादन केले होते. शिंदेंच्याच गर्दीत ते येण्यापूर्वी जाऊन दिघेंना अभिवादन करण्यामुळे विचारे यांना वेगळी गर्दी जमवावी लागली नाही. जमलेल्या गर्दीला हात दाखवत विचारे यांनी मौके पे चौका मारल्याचीच चर्चा होती.