पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार पोहोचले कोकणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:37 AM2021-08-01T04:37:11+5:302021-08-01T04:37:11+5:30
कल्याण : जोरदार अतिवृष्टीमुळे कोकणाला जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तर, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले ...
कल्याण : जोरदार अतिवृष्टीमुळे कोकणाला जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तर, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात पोहोचले. डोंबिवली शिवसेना शहर शाखेने ही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
खासदारांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण येथील नागरिकांना अन्नधान्य, पाणी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे मदत साहित्य घेऊन १६ ट्रक आणि एक एसटी बस ३० जुलैला कोकणात रवाना झाली होती. या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, राजेश कदम, हनुमान ठोंबरे, उल्हासनगरचे नगरसेवक अरुण आशान आदी उपस्थित होते.
पूर ओसरल्याने तेथे साथींचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, पनवेल मनपाचे सफाई कर्मचारी व टीडीआरएफ जवानांच्या मदतीने महाडमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. खा. शिंदे यांनी स्थानिक प्रशासनासह महाड येथील पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महाड येथील कोठेश्वरी तळे, प्रभात कॉलनी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
आरोग्य शिबिराला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मोफत आरोग्य शिबिरालाही खा. शिंदे यांनी भेट दिली. या वेळी तेथील डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. तसेच जास्तीतजास्त नागरिकांनी या शिबिरात आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन खा. शिंदे यांनी केले. या शिबिरात रुग्णांना औषधे मोफत दिली जात आहेत.
फोटो-कल्याण-श्रीकांत शिंदे
-------------