चुक तुमची खापर आमच्या माथी का? खासदार शिंदेंचा संतप्त सवाल; वाहतूक विभागावर संतापले
By अजित मांडके | Published: November 2, 2023 03:52 PM2023-11-02T15:52:43+5:302023-11-02T15:53:19+5:30
चुक पोलिसांची आणि त्याचे खापर आमच्या माथी का मारता, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी वाहतुक विभागाची चांगलीच रखडपट्टी काढली आहे...
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लुईसवाडी येथे शूभदिप हे खाजगी निवासस्थान आहे. या बंगल्यात त्यांचे सूपूत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कूटंूबिय ये जा करीत असतात. त्यामूळे या ठिकाणी कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामूळे येथील सर्व्हीस रोड बंद करुन वाहतूकीत बदल करण्याची अधिसूचना वाहतूक विभागाने काढली होती. मात्र त्यावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे चांगलेच संतापले असून वाहतूक विभागाने हे परस्पर पत्रक काढून आमच्या कूटूबियांची नाहक बदनामी केली असल्याचे म्हंटले आहे. चुक पोलिसांची आणि त्याचे खापर आमच्या माथी का मारता असा सवालही त्यांनी उपस्थित करीत वाहतुक विभागाची चांगलीच रखडपट्टी काढली आहे.
ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी सायंकाळी एक अधिसूचना काढली होती. त्यामध्ये नितीन ब्रिजखालून प्रजा स्नॅक्स समोरून सर्व्हिस रोडने लॅण्डमार्क सोसायटी, काजुवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रजा स्नॅक्स येथे 'प्रवेश बंद' करण्यात आली असून ती वाहने नितिन ब्रिजखालून कामगार नाका कडे जाणाऱ्या रोडने सरळ जावून पुढे अपोलो फार्मसी मेडिकल, रामचंद्रनगर, जिजामाता नगर येथून डावे वळण घेऊन पुढे जाणार आहेत. तसेच काजुवाडी कट येथून सर्व्हिस रोडने प्रजा स्नॅक्स कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना काजुवाडी कट लॅण्डमार्क सोसायटी कॉर्नर येथे प्रवेश बंद केल्याने ती वाहने काजुवाडी कट येवून उजवे वळण घेऊन हायवे स्लीप रोडने पुढे मार्गक्रमण करील असे म्हटले होते.
वाहतुक बदलाची ही अधिसूचना काढल्यानंतर सोशल मिडियावर ती चांगलीच व्हायरल झाली. याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजताच त्यांनी वाहतूक पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पध्दतीने कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा माझ्या कूटूबिंयांनी केली नव्हती. किंवा याची पूर्वकल्पना देखील आम्हाला वाहतूक पोलिसांनी दिलेली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आमचे येणे जाणे सूकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही.
तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय आहे. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही.
पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी. तसेच, हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्वीप्रमाणेच खुला ठेवावा अशे त्यांनी सांगितले आहे. त्यांनतर लागलीच वाहतूक विभागाने हि अधिसूचना मागे घेतली आहे.