भार्इंदरमधून पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी संकलनाचा श्री गणेशा
By Admin | Published: March 5, 2017 06:37 PM2017-03-05T18:37:24+5:302017-03-05T18:43:41+5:30
देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने
ऑनलाइन लोकमत/ राजू काळे
भार्इंदर, दि. 5 - देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने श्रमजीवी संघटनेने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा श्री गणेशा भार्इंदर येथील संघटनेच्या कार्यालयातून संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या हस्ते करण्यात आला.
जगातील कुपोषित बालकांच्या यादीत भारत अव्वल ठरत आहे. त्याचे प्रमाण २० कोटी इतके असून राज्यातील प्रमाण ३७ हजार ५०० इतके आहे. राज्यातील एकट्या पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून ते आजमितीस ७ हजार ८५३ इतके आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ८०० कुपोषित बालकांचा पोषक आहाराअभावी मृत्यु झाला आहे. देशातील शहरी तसेच ग्रामीण भागात राहणारे ९१ टक्के आदिवासी दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. त्यातील बहुतांशी बालके व माता कुपोषित आहेत. त्यांना पुरेसा व सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडुन अनुसूचित क्षेत्रातील बालकांच्या विकासासाठी ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी आॅगस्ट २०१५ मध्ये बंद करण्यात आला. यामुळे पुरेशा निधीअभावी बालकांना पोषण पुर्नवसन केंद्रांतर्गत आवश्यक आहार मिळेनासा झाला आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत पुरेसे काम ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाही.
रोजगाराअभावी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. परिणामी बालकांचे कुपोषण होत आहे. ज्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार मिळतो, अशा लाभार्थ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल अंतर पायी चालावे लागते. यात वेळ वाया जात असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे पुरेशा रोजगाराला लोकं मुकतात. अशा ग्रामीण तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाय््राा कुटुंबातील बालके योग्य, सकस आहार व अदयावत उपचारापासुन वंचित रहात आहेत. यासाठी राज्य सरकारने बंद केलेला निधी आदिवासी विकास योजनेंतर्गत उपलब्ध करुन द्यावा, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातुन सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. परंतु, त्याची दखल अद्याप सरकारकडुन घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हार येथे गेल्या अनेक महिन्यांपासुन उपचार छावणी सुरु करण्यात आली आहे. त्यातील उपचारासाठी निधीची कमतरता भासत असल्याने ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातुन निधी संकलित करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आल्याचे विवेक पंडीत यांनी सांगितले.