जयंत पाटील गुरुजींनी घेतली हजेरी, लोकसभेची रणनिती आखण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:28 AM2018-10-06T05:28:02+5:302018-10-06T05:29:44+5:30

गैरहजर पदाधिकाऱ्यांपुढे लाल फुली : बुथस्तरावर काम करण्याचा दिला गृहपाठ

Mr. Jayant Patil took the initiative to start the strategy of Loksabha | जयंत पाटील गुरुजींनी घेतली हजेरी, लोकसभेची रणनिती आखण्यास सुरुवात

जयंत पाटील गुरुजींनी घेतली हजेरी, लोकसभेची रणनिती आखण्यास सुरुवात

Next

अजित मांडके 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कडक गुरुजींच्या आविर्भावात पक्षाच्या मेळाव्याला आले. वर्गात शिरताच त्यांनी उपस्थितांच्या यादीतील नावे वाचायला सुरुवात केली. वर्गात हजेरी सुरू झाल्यावर पोरं जशी पटापट उठून हजर... हजर म्हणतात तसे पदाधिकारी उभे राहत होते. पाटील गुरुजींच्या वर्गातील चार विद्यार्थी गैरहजर असल्याचे लक्षात येताच त्यांनी खिशातून लाल शाईचे पेन काढून त्यांच्या नावापुढं फुली मारली. आगामी निवडणुकीकरिता बुथस्तरावर काम करण्याबाबतचा गृहपाठ देऊन बाहेर पडताना पाटील गुरुजींनी दोन महिन्यांनंतर कुणी किती गृहपाठ घेतला, याची हजेरी घेईन, असे जाहीर केले.

पाटील गुरुजींनी शहराध्यक्षापासून उपाध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांची हजेरी घेतली. जे गैरहजर राहिले, त्यांचा समाचार पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादीतील गुरुजींच्या ‘मॉनिटर’ असलेल्या सूत्रांनी दिली. उपस्थित पदाधिकाºयांना एकत्रित काम करण्याचे धडे त्यांनी दिले. आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याचा मूलमंत्र पाटील गुरुजींनी दिला.

पाटील गुरुजी गुरुवारी ठाण्यात आले होते. टिप टॉप प्लाझा येथे निवडक पदाधिकाºयांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ८६ पैकी ८२ पदाधिकारी हजर होते. पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित चार पदाधिकाºयांवर काय कारवाई होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
भाजपाला पराभूत करण्यासाठी संघटनेचे जाळे मजबूत करण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. गटातटांचे राजकारण बाजूला सारून एकत्रित काम करण्याचा पाठ त्यांनी शिकवला. दोन महिन्यांत बुथस्तरावर कुणीकुणी काय काम केले, किती लोकांशी संपर्क साधला, किती बैठका घेऊन पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत नेली, किती पदाधिकारी या कामात सहभागी झाले, याचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गटबाजीचा इतिहास विसरून राष्ट्रवादी आता एकजुटीचा भूगोल शिकणार का? पाटील गुरुजींचा गृहपाठ किती विद्यार्थी (पदाधिकारी) जोमाने करणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

गणेश नाईकांना आठवले सुरज परमार

संघटनकौशल्य, पक्षवाढ या वेळापत्रकानुसार पाटील गुरुजींचा वर्ग सुरू असताना राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांना भाषणाच्या ओघात ठाण्यातील बिल्डर मित्रांची आठवण झाली. ठाण्यातील अनेक बिल्डर हे माझ्या चांगल्या परिचयाचे असल्याचा उल्लेख नाईक यांनी केला.

काही महिन्यांपूर्वी एका विकासकाने आत्महत्या केली, असा उल्लेख नाईक यांनी करताच वर्गातील विद्यार्थी (पदाधिकारी) यांनी सुरज परमार यांच्या नावाचा गलका केला. राष्ट्रवादीतील परमार यांच्याशी नाव जोडले गेलेल्या काही नगरसेवकांचे चेहरे यामुळे गोरेमोरे झाले.

Web Title: Mr. Jayant Patil took the initiative to start the strategy of Loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.