लग्नाचे अमिष दाखवून उच्चपदस्थ तरुणींना करोडोंचा गंडा घालणारा मिस्टर नटवरलाल जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:52 PM2022-01-14T20:52:08+5:302022-01-14T20:57:33+5:30
महिलांना आपण उच्च पदस्थ अधिकारी किंवा शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करीत लग्नाच्या अमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मिस्टर नटवरलाल अर्थात आदित्य उर्फ नव्हुश उर्फ तन्मय प्रशांत म्हात्रे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने गुरुवारी अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली. विवाह जमविणाºया संकेतस्थळांवरुन लग्न जमविताना चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात जाणार नाही अथवा प्रलोभनाला बळी न पडता फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे तसेच पैशाची अथवा इतर अनैतिक मागणी केल्यास त्यापासून वेळीच सावध होण्याचे आवाहनही मोराळे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मेट्रोमोनियल साईटवरुन तरुणी तसेच चाळीशी ओलांडलेल्या महिलांना आपण उच्च पदस्थ अधिकारी किंवा शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करीत लग्नाच्या अमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मिस्टर नटवरलाल अर्थात आदित्य उर्फ नव्हुश उर्फ तन्मय प्रशांत म्हात्रे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने गुरुवारी अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली.
मेट्रोमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून उच्चपदस्य अधिकारी असल्याचे भासवून लग्नाच्या अमिषाने वेगवेगळया कारणांनी त्यांच्याकडून वेगवेगळया बँकेच्या खात्यात पैसे वळते करण्यास सांगून तथाकथित आदित्य पसार झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये जीवनसाथी डॉट कॉम तसेच शादी डॉट कॉम अशा विवाह जुळविणाºया संकेतस्थळांवरुन महिलांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे आल्या होत्या.
त्याचअनुषंगाने पोलीस आयुक्तांनी याबाबत तपासाचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. अतिरिक्त आयुक्त मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव, दिनेश शेलार, महेश जाधव, हवालदार जयकर जाधव, अर्जुन करके, नितीन ओवळेकर, रूपवंत शिंदे, नागराज रोकडे, किशोर भामरे, अजित शिंदे, बाळा ठाकरे आणि महिला आशा पाटील आदींच्या पथकाने मोठया कौशल्याने तपास करुन गुरुवारी तन्मयला ताब्यात घेतले. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची व्याप्ती समोर आली.
कल्याण येथे एका महिलेने लग्न जमवणाºया जीवनसाथी या मेट्रोमोनियल संकेतस्थळावर आपली माहिती दिली होती. तिथूनच आपण इस्त्रोमध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ असून लग्नास इच्छुक असल्याची त्याने तिला बतावणी केली. नंतर ओळख वाढवून लग्नाच्या अमिषाने तिच्याकडून वेगवेगळया कारणांनी १४ लाख ३६ हजारांची रक्कम बँक खात्यावर घेतली. पुन्हा त्याने २५ लाखांच्या रकमेची मागणी केल्यानंतर तिला त्याचा संशय आल्याने तिने याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ४ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला.
ठाणे पोलिसांचे पथक या ठकसेनाच्या मागावर असतांना तो नेहमी आपले वास्तव्याचे ठिकाणी बदलत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरु असतांनाच वाशी येथे तो असाच एका मुलीला भेटण्यासाठी आला असता, होनराव यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
* ठकसेन म्हात्रे विवाहित-
तन्मय म्हात्रे हा विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. नासा किंवा इस्त्रोमध्ये वरिष्ठ पदावर मोठ्या पदावर नोकरीस असल्याची तो बतावणी करायचा. त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर १४ महिला आणि मुलींची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आणखीही काही महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. त्याच्याविरुद्ध मुंबईतील दिंडोशी, पार्कसाईट, कल्याणमधील खडकपाडा, पुण्यातील पिंपरी,अलिबाग, नवी मुंबईतील रबाळे आणि एपीएमसी आदी सात पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.
* पिडित महिलांना पोलिसांचे आवाहन-
आदित्य उर्फ नव्हश उर्फ तन्मय म्हात्रे या नावाने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे संपर्क साधावा. विवाह जमविणाºया संकेतस्थळांवरुन लग्न जमविताना चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात जाणार नाही अथवा प्रलोभनाला बळी न पडता फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याचे तसेच पैशाची अथवा इतर अनैतिक मागणी केल्यास त्यापासून वेळीच सावध होण्याचे आवाहनही मोराळे यांनी केले आहे.