‘शास्त्रीनगर’मध्ये एमआरआय, सिटीस्कॅन,पालकमंत्र्यांनी घेतली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:13 AM2019-02-07T02:13:32+5:302019-02-07T02:14:08+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी या आरोग्य सुविधा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी या आरोग्य सुविधा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधा येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित होतील. हा विषय लवकर मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागास दिले आहेत.
महापालिकेच्या शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांतील आरोग्य सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारीवर्गासह आयुक्तांनाही पाचारण केले होते. महापालिकेच्या रुग्णालयात नागरिकांना योग्य आरोग्यसेवा मिळत नसल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आवाज उठवत महापालिका प्रशासनास धडक दिली होती. महापालिकेची दोन्ही रुग्णालये आरोग्यसेवा देण्यास असमर्थ असतील, तर ती शासनाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे आली. त्यावर प्रकाश टाकणारी भूमिका ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात मांडली. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीमध्ये शास्त्रीनगर रुग्णालयात अद्ययावत आरोग्यसेवा पुरवण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
महापालिकेकडून आरोग्यसेवा पुरवणे शक्य नसल्यास या रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जावी, असा प्रस्ताव कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिला होता. त्यानुसार, आयुक्तांनी हालचाली सुरू केल्या. यासाठी कृष्णा डायग्नोस्टिक ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी पीपीपी तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जात आहे. महागडी आरोग्य यंत्रणा महापालिका खरेदी करू शकत नाही. महापालिकेने यंत्रणा खरेदी केली तरी, तिचा योग्य वापर करण्यासाठी महापालिकेकडे तज्ज्ञ कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून ही सेवा पीपीपी तत्त्वावर उपलब्ध केल्यास आरोग्यनिदान करणाºया महागड्या यंत्रणा खरेदी करण्याची गरज पालिकेला राहणार नाही. ती सेवा पुरवणारी संस्थाच ही यंत्रणा कार्यान्वित करणार आहे.
सोनोग्राफी, एमआरआय, सिटीस्कॅनसारख्या आरोग्यसेवा कृष्णा डायग्नोस्टिककडून सरकारी दरात रुग्णांना दिल्या जातील. दोन महिन्यांत हा विषय मार्गी लावला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून कृष्णा डायग्नोस्टिकला कार्यादेश देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सरकारी दरात रुग्णांना आधुनिक आरोग्यसेवा देणे शक्य होणार असल्याचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
शास्त्रीनगर रुग्णालयाप्रमाणेच कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात याच धर्तीवर सोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि एमआरआय या सुविधाही पीपीपी तत्त्वावर पुरवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत २७ गावे २०१५ पासून समाविष्ट आहेत. २७ गावांतील निळजे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावे महापालिकेत सरकारने समाविष्ट केली असली, तरी निळजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारने महापालिकेस हस्तांतरित केलेले नाही. हे केंद्र महापालिकेने ताब्यात घेतले असले, तरी महापालिकेकडे कर्मचारी कमी असल्याने ते चालवणार कसे, असा प्रश्न आरोग्य विभागाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
कर्मचारी आणि जागेचा अभाव
रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या विषयावर पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय दिला नसला, तरी महापालिका रुग्णालयात किती कर्मचारी आहेत, याची माहिती त्यांनी अधिकाºयांकडून घेतली. महापालिकेच्या रुग्णालयात ४०१ मंजूर पदांपैकी केवळ १४४ पदे भरली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची ११५ पदे आहे. त्यापैकी ४९ पदे भरली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. याशिवाय, १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत दिवसाला एक हजार ५०० रुग्णांची ओपीडी असते. महापालिकेकडे पुरेसा स्टाफ व जागा नसल्याचा मुद्दा आरोग्य खात्याकडून मांडण्यात आला. नागरी आरोग्य केंद्रांतही ओपीडी सुरू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.