कोपर उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी महावितरणने घेतले शटडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:43+5:302021-09-05T04:46:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेल्या कोपर उड्डाणपुलावरून वाहतुकीचा प्रारंभ मंगळवारी दुपारी दीड वाजता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेल्या कोपर उड्डाणपुलावरून वाहतुकीचा प्रारंभ मंगळवारी दुपारी दीड वाजता करण्याचे नियोजन सुरू असल्याने अत्यंत तातडीने नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रामनगर फिडरवर महावितरणने शनिवारी सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शटडाऊन घेतला. त्याचा त्रास वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन स्कूल करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांना झाला. बहुतांश सोसायट्यांना सकाळच्या वेळेत येणारे पाणी गच्चीतील टाकीत चढवता न आल्याने त्यांचीही गैरसोय झाली.
वीज खंडित करायची होती तर त्याची पूर्वकल्पना का दिली नाही? उद्घाटनाचा त्रास नागरिकांना का? पुलाचे उद्घाटन अचानक मंगळवारी का करण्यात येत आहे? शुभारंभाचा थाट कशाला? असे सवाल त्रस्त नागरिकांनी केले. आधीच अभ्यासाचा बोऱ्या वाजला आहे, नोकऱ्यांचा पत्ता नाही, रेल्वे सेवा सामान्यांना उपलब्ध नाही. जे काही उत्पन्न मिळते आहे त्यात कसेबसे भागवावे लागत आहे. हे शासकीय यंत्रणांना कधी कळणार? अशा शब्दांत या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिजवरील कंडक्टर काढण्याचे काम असल्याने वीज खंडित करण्याबाबत सूचना महापालिकेने केली. त्यानुसार आम्ही त्यांना सहकार्य केले आणि काही तासांसाठी रामनगरची वीज खंडित केली. परंतु साडेपाचच्या सुमारास ती पूर्ववत केली.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी लोकार्पण करण्याचे नियोजन आहे, मात्र त्यास अजून अंतिम स्वरूप दिलेले नाही. त्यामुळे तातडीने काम करणे गरजेचे असल्याने वीजपुरवठा खंडित केला होता.
............
वाचली.