महावितरणची ‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:09+5:302021-03-13T05:13:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीज बिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीज बिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करणे सुरू आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्चमध्ये जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. कल्याण पूर्वेतील नेतिवली उपविभागीय कार्यालयातून गुरुवारी सकाळी ग्राहक जनजागृतीसाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. त्यात त्यांनी स्वतः सहा किलोमीटर सायकल चालवत या रॅलीत सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.
अग्रवाल यांच्या समवेत परिमंडळ कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, प्रणाली विश्लेषक रंजना तिवारी तसेच अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंते नरेंद्र धवड, धनराज बिक्कड, दिगंबर राठोड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व जनमित्र या रॅलीत सहभागी झाले. वापरलेल्या विजेचे बिल भरण्याची ‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ पार पाडण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. हाजीमलंग रोडवरील द्वारली गावातील गोलोबा मंदिरात रॅलीचा समारोप झाला.
यानिमित्ताने ग्राहकांचे प्रबोधन करून वीज बिल वसुलीचे आव्हान लीलया पेलण्याचे आवाहन अग्रवाल यांनी यावेळी केले. रॅलीच्या आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंते जितेंद्र प्रजापती, ग्यान पानपाटील व नितेश ढोकणे यांनी प्रयत्न केले. चालू वीज बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.
--------