एमएसआरडीसीने थकविले पालिकेचे खड्डे बुजविण्याचे ६२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:13 AM2019-09-20T01:13:22+5:302019-09-20T01:13:31+5:30
ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे ...
ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने कानाला खडा लावला आहे. गेल्यावर्षी अशा पद्धतीने या प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यांना खड्डे पडले होते. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर ६२ लाखांचा भुर्दंड पडला होता. हा खर्च परत मिळावा म्हणून, पालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खर्च वसूल कसा करायचा, असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.
यंदा ठाण्यातील मागील १० वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नव्या आणि जुन्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत. परंतु, पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात या खड्ड्यांच्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपकडून राजकीय भांडवल केले जात आहे. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आजही शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी आदींसह शहरातील इतर भागातही खड्डे पडले आहेत. पालिकेने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत.
दरम्यान, पालिकेने त्यांच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहेत. परंतु, इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी असहकार पुकारला आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षीदेखील शहरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यावेळी रस्ते कोणाचेही असोत, त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर, यासाठी झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून परत मिळावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, वर्ष उलटूनही त्यांच्याकडून यासाठी झालेला ६२ लाखांचा खर्च पालिकेला मिळू शकलेला नाही. उलट, या प्राधिकरणाकडून तुम्ही आमच्या रस्त्यांवरील खड्डे का बुजवले, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.
>मागचा कटू अनुभव विचारात घेता, यंदाच्या पावसात शासनाच्या मालकीच्या आणि एमएसआरडीसीच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. परंतु, लोकांच्या सोयीसाठी हे खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पालिकेने एमएसआरडीसी आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.