‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:23 AM2021-05-11T08:23:57+5:302021-05-11T08:28:45+5:30
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला.
ठाणे : कोरोनातून ठाणे जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असून, या म्युकरमायकोसिस आजारात रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत, असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दाखल घेत, त्यांच्या काही चाचण्या केल्या. त्या चाचणी अहवालातून त्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे पुढे आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच प्रकाश दाखवल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्येही सूज असल्याचे स्पष्ट झाले. तिला म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याच्या निर्णयाप्रत डॉक्टर आले आहेत. जिल्ह्यातील या आजाराची बहुतेक ही पहिली रुग्ण आहे. जिल्ह्यातील खासगी नेत्रतज्ज्ञांकडे आणखी कुणी रुग्ण म्युकरमायकोसिसवर यापूर्वीच उपचार घेत असतील तर त्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही.
जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बरा होण्याकरिता बहुतांश रुग्णांना डॉक्टर स्टीरॉइड देत आहेत. मधुमेहाने आजारी असलेल्या रुग्णांना स्टीरॉइड दिले व त्यामुळे त्यांची रक्तशर्करा वाढली त्याचवेळी रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती खालावली तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येतो. रुग्णांच्या डोळ्यांवर या आजारात परिणाम होतो. रुग्णांचे डोळे निकामी होण्याचा धोका असतो. हे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजाराचे सायनसमधून संक्रमण होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. रुग्णांना वेळीच उपचार मिळाले नाहीत तर पॅरालिसिस आणि मृत्यूही येण्याची शक्यता असते.
कुठेही होऊ शकतो आजार
म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीतदेखील होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
काय आहेत लक्षणे?
वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.
या रुग्णांना अधिक धोका
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या नवीन आजाराचा धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँटिव्हायरल आणि स्टेरॉइड द्यावेच लागतात. या औषधांनी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका आहे.
एका महिला रुग्णाला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, हा आजार स्टेरोईडच्या किंवा अँटिबायोटिकच्या अतिसेवनामुळे झाला असल्याची शक्यता आहे. या आजाराची गांभीर्याने दाखल घेत, त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
- डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकेवर काढल्याने रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.