डम्पिंग ग्राऊंड परिसरात चिखल व दुर्गंधी, नागरिकांनी अडविले कचऱ्याचे डंपर अन् ट्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 05:14 PM2021-06-12T17:14:19+5:302021-06-12T17:15:03+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो झाले असून संततधार पावसाने डम्पिंगवरील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील झोपडपट्टी व रस्त्यावरून वाहत आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीयुक्त पाणी शेजारील झोपडपट्टी व रस्तावर आल्याने, सर्वत्र चिखल व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. दुर्गंधी व चिखलाच्या निषेधार्थ नागरिकांनी कचऱ्याचे डंपर व ट्रक अडवून उपाययोजना करण्याची मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो झाले असून संततधार पावसाने डम्पिंगवरील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील झोपडपट्टी व रस्त्यावरून वाहत आहे. डम्पिंगवरून वाहणाऱ्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. रविवारी सकाळी डम्पिंग खालील झोपडपट्टी परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी डम्पिंगवर कचरा घेऊन जाणारे डंपर व ट्रक अडविल्याने, कचऱ्याचा गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व अन्य अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढून रस्त्यावरील चिखल उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच नव्याने रस्ता बांधनाची आश्वासन देण्यात आले.
महापालिकेचे म्हारळगाव शेजारील राणा कंपाऊंड डम्पिंग ओव्हरफलो झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथे शहरातील कचरा टाकण्याचे सुरवात केली. डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आले. दरम्यान उसाटने गावा हद्दीतील ३० एकर जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने दिली असून जागेला कंपाऊंड घालण्याचे काम सुरू आहे. खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक व नगरसेवक यांनी करून ठिय्या आंदोलन, उपोषण, मोर्चा, गाडी अडविणे आदी आंदोलन हजारो नागरिकांनी केले. मात्र डम्पिंग साठी पर्यायी जागा मिळत नसल्याने डम्पिंगच्या प्रश्न जैसे थै आहे.
हजारो नागरिकांच्या आरोग्याचा धोका?
खडी मशीन येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो होऊन डम्पिंग वरील दुर्गंधीयुक्त पावसाचे पाणी डम्पिंग खालील झोपडपट्टीत जात आहे. झोपडपट्टी व रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाण्याने चिखल निर्माण झाले. स्थानिक नागरिकांना रस्ता दुरुस्ती व चिखल उचलण्याचे आश्वासन मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व इतर अधिकाऱ्यांनी दिल्याने, नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. चिखल व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचेनारोग्य धोक्यात आले आहे.