मुर्धा खाडीचे अस्तित्व धोक्यात, बेकायदा भराव, बांधकामांकडे पालिकेचे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:39 AM2019-05-31T01:39:15+5:302019-05-31T01:39:24+5:30

उत्तरेकडच्या वसई खाडीला तर दक्षिणेकडच्या जाफरी खाडीला जोडणारी मुर्धा खाडी ही एकेकाळी भरतीच्या स्वच्छ पाण्याची होती. खाडीत स्थानिकांची मासेमारी चालते

Mudhadha creek threatens existence, illegal construction, municipal corporation's eyes | मुर्धा खाडीचे अस्तित्व धोक्यात, बेकायदा भराव, बांधकामांकडे पालिकेचे डोळेझाक

मुर्धा खाडीचे अस्तित्व धोक्यात, बेकायदा भराव, बांधकामांकडे पालिकेचे डोळेझाक

Next

मीरा रोड : एकेकाळी मासेमारी व मीठ उत्पादनासाठी महत्त्वाची असणारी आणि बोटींची वाहतूक होणारी मुर्धा खाडी आता बेकायदा भराव, बेकायदा बांधकामे, मोठ्या प्रमाणात टाकला जाणारा कचरा आणि थेट खाडीत सोडलेल्या सांडपाण्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. खाडी व सरकारी जागा असूनही राजरोस चालणाऱ्या अतिक्रमणाकडे पालिकेसह लोकप्रतिनिधी व महसूल विभागाने सर्रास डोळेझाक केली आहे. खाडीचा पार नाला करून टाकला असून खुद्द पालिकेनेही खाडीचे नाला म्हणून बारसे घातले आहे.

उत्तरेकडच्या वसई खाडीला तर दक्षिणेकडच्या जाफरी खाडीला जोडणारी मुर्धा खाडी ही एकेकाळी भरतीच्या स्वच्छ पाण्याची होती. खाडीत स्थानिकांची मासेमारी चालते. याच खाडीच्या पाण्यावर मीठ उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मिठागरांमधून मासेमारी चाले. मिठाची वाहतूकही होड्यांमधून याच खाडीतून चाले. पण, गावातीलच काही माफियांनी खाडीपात्रासह परिसरातील सरकारी जमिनींची तसेच भराव करून बेकायदा बांधकामांची विक्री सुरू केली. पालिका, महसूल विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व राजकारण्यांनीही या बेकायदा बांधकामांमधून आपले उखळ पांढरे करत अतिक्रमणांना संरक्षण दिले. भराव व बांधकामांसाठी परिसरातील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली.

कायद्याने संरक्षित असूनही खाडीपात्र व परिसरात तसेच सीआरझेड आणि सरकारी जागेत राजरोस बेकायदा भराव व बांधकामांना पालिकेने स्थानिक लोकप्रतिनिधी आदींच्या संगनमताने नळजोडण्या, करआकारणी, वीजपुरवठा, पायवाटा आदी सर्व सुविधा मिळत गेल्या. पैशांसह मतांचे राजकारण महत्त्वाचे ठरले. पाण्याचा प्रवाहच बंद झाल्याने विविध प्रकारचे मासे कायमचे खाडी सोडून गेले.
पालिकेसह खाडीपात्र व परिसरातील बेकायदा बांधकामांचे मलमूत्र, सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जाते. सांडपाणी प्रक्रिया करून सोडणे कायद्याने बंधनकारक असताना त्याचे सर्रास उल्लंंघन करून खाडी प्रदूषित करण्यात आली. त्यातच, परिसरात राहणारे नागरिक थेट खाडीतच कचरा टाकतात. पालिकेच्या नाल्यातून वाहून येणारा कचराही खाडीतच साचून राहतो. अतिक्रमणासह खाडी कचरा आणि गाळाने कोंडली आहे.

अतिक्रमण, सांडपाणी, कचºयामुळे पाण्याचा प्रवाहही अडखळला आहे. मासेमारी बंद होऊन मिठागरांना भरतीचे पाणीही मिळेनासे झाले आहे. यात खाडी परिसरातील बेकायदा बांधकामांमुळे गावपण हरवलेच, पण राजकीयदृष्ट्याही ग्रामस्थांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. दुर्दैवाने याला गावातील ग्रामस्थांची डोळेझाकही जबाबदार आहे.

खाडीपात्र व परिसरात भराव व बेकायदा बांधकामे सुरू आहेत. परंतु, याबद्दल कारवाई तर सोडाच, पण लोकप्रतिनिधी, पालिका व गावातील प्रमुख मंडळीही गप्प आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खाडीतील बेकायदा भराव व बांधकामे काढली जातील. कचरा टाकणे बंद केले जाईल. पूर्वीप्रमाणेच खाडी रुंद करू. त्यासाठी आराखडा तयार करू. कांदळवनाची झाडे आवश्यकतेप्रमाणे परवानगी घेऊन काढून अन्यत्र वा किनारी लागवड करू. - बालाजी खतगावकर, आयुक्त

आपण स्वत: अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून खाडीतील भराव व नव्याने चालणारी बांधकामे दाखवली आहेत. त्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करून खाडीपात्र अतिक्रमणमुक्त केले पाहिजे. इतकी गंभीर स्थिती असताना कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे. - वर्षा भानुशाली, नगरसेविका

खाडीतील बेकायदा भराव व बांधकामे तोडा, बेकायदा सोडले जाणारे सांडपाणी, कचरा बंद करा, याविरोधात २०१५ पासून तक्रारी केल्या. सांडपाणी, कचºयाच्या गाळात तिवरांची झाडे वाढल्याने सफाईला अडथळा होतो. पण, पालिकेने कारवाई केली नाही. मीठ व मासेमारी व्यवसाय बंद पडून स्थानिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. - अशोक पाटील, अध्यक्ष, शिलोत्री संघ

खाडीपात्र व परिसर संरक्षित असूनही त्यात बेकायदा भराव व बांधकामे झाली. बेकायदा सांडपाणी व कचरा टाकून खाडी प्रदूषित केली, याला पालिका, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. पण, त्याविरोधात हे ठोस कारवाईच करत नाहीत. कारण, त्यात नोट आणि व्होट मिळत असते. कांदळवनामुळे पाण्याचा प्रवाह थांबत नाही. स्वत:ची पापे झाकण्यासाठी हा कांगावा आहे. - स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्ती

Web Title: Mudhadha creek threatens existence, illegal construction, municipal corporation's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.