विनयभंग करून खंडणी उकळणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:18 AM2018-09-01T04:18:58+5:302018-09-01T04:19:34+5:30
आत्महत्येची धमकी : मैत्रिणीला केले ब्लॅकमेल
ठाणे : आत्महत्या करण्याची धमकी देऊन आपल्याच सतरावर्षीय मैत्रिणीचे अश्लील फोटो स्रॅपचॅटद्वारे मिळवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून चार हजारांची खंडणी उकळून आणखी ५० हजारांची मागणी करणाºया गौरव शैलेंद्र मोरे (२१) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईच्या एका नामांकित महाविद्यालयात हे दोघेही शिकतात. तो तृतीय वर्षाला, तर ती प्रथम वर्षाच्या (तेरावी) वर्गात असल्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ती ठाण्यात तर तो वरळीतील बीडीडी चाळीत वास्तव्याला आहे. स्नॅपचॅटवर चॅटिंग करताना त्याने तिला अचानक प्रेमाची गळ घातली. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला आत्महत्येची धमकी दिली. नंतर, त्याने अचानक त्याचे अर्धनग्न छायाचित्र त्यावर टाकले. तिलाही तसे करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर त्याने पुन्हा आता लाइव्ह माझी आत्महत्या बघ, अशी तिला धमकी दिली. स्रॅपचॅटवर कोणतेही छायाचित्र किंवा संदेश काही काळाने आपोआप नष्ट होत असल्याचे तिला माहीत होते. त्यामुळेच ती त्याच्या दबावाखाली येऊन त्याच्या विचित्र मागणीला बळी पडली. पण, त्याने हाच फायदा उचलून पुढे तिच्याकडे आणखी अशाच विचित्र मागण्या सुरू ठेवल्या. तिने त्याला स्पष्ट नकार दिल्यावर मात्र स्रॅपचॅटचे ‘ते’ फोटो आपण रेकॉर्ड केल्याचे त्याने तिला सांगितले. हे समजल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याच जोरावर त्याने तिच्याकडून चार हजार रुपये उकळले. त्यानंतर, आणखीही त्याने ५० हजारांची मागणी केली. त्यानंतर, मात्र तिने महाविद्यालयात जाणेच बंद केले. मुलीने महाविद्यालयात जाणे का बंद केले, याची पालकांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
मुंबईतून केली अटक
/>च्वर्षभराच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराची पीडितेने पालकांच्या मदतीने अखेर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने गौरवला मुंबईतून अटक केली.