नव्या पुलाला मुहूर्त
By admin | Published: October 10, 2016 03:22 AM2016-10-10T03:22:43+5:302016-10-10T03:22:43+5:30
पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर
उल्हासनगर : पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर खर्च न करता नवीन पूल बांधला जाईल. दिवाळीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. यासाठी सव्वादोन कोटी खर्च येणार असून वर्षभरात पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मागील महिन्यात हा पूल कोसळल्याने येथील गावांचा संपर्क तुटला. नागरिक जीव मुठीत घेऊन या तुटलेल्या पुलावरून ये-जा करत आहेत. शालेय विद्यार्थीही येथून जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालधुनी नदीपलीकडे वडवली गाव आहे. गावाला जाण्यासाठी अंबरनाथहून मोठा, तर उल्हासनगरहून लहान पूल आहे. ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पुलाची मागणी माजी नगरसेविका सुमन शेळके व उपमहापौर पंचशीला पवार यांनी पालिकेकडे वारंवार केली होती.
दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाची निविदा काढली होती. मात्र, कंत्राटदारच मिळाला नाही. ज्या कंत्राटदाराला पुलाचे काम मिळाले, त्याने अद्यापही काम सुरू केले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नवीन पुलाच्या उभारणीला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने पर्यायी पादचारी पूल किंवा अर्धवट कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पवार यांनी पालिकेकडे लावून धरली. गेल्या महासभेत पुलाच्या दुरुस्तीबाबत पीठासीन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दुरुस्तीचे आदेश दिले. वडवली पुलाच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पालिकेने नाखवा कंपनीकडे मागितला होता. कंपनीच्या पथकाने पुलाचे निरीक्षण केल्यावर दुरुस्ती सूचवून ३० लाखांचा प्रस्ताव सादर केला.