कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यास मिळाला मुहूर्त; ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:37 AM2020-02-04T00:37:16+5:302020-02-04T00:37:43+5:30
२० ठिकाणे निश्चित
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीला शिस्त लागावी आणि वाहतूककोंडी टाळावी, यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २० ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे. हे काम डिसेंबर २०२० अखेर पूर्णत्वास येणार आहे. सध्या पूर्वेतील चक्कीनाका येथे पहिला सिग्नल बसविण्यात येत आहे. त्यानंतर पश्चिमेतील प्रेम आॅटो चौकात दुसरा सिग्नल कार्यान्वित केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अभियंता तरुण जुनेजा यांनी सोमवारी ही माहिती दिली. सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी कल्याण व डोंबिवली शहरांतील एकूण २० ठिकाणे वाहतूक पोलीस व पोलीस उपायुक्तांनी प्रस्तावित केली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी तर, दुसऱ्या टप्प्यात पाच ठिकाणी सिग्नल बसवले जाणार आहेत.सिग्नल यंत्रणा ही स्वयंचलित काउंटडाउन डिजिटल सिस्टीमची असणार आहे. डिसेंबर २०२० पर्यंत २० ठिकाणी सिग्नल लावण्याचे काम पूर्ण होणार आहे.शहरातील केवळ २० ठिकाणे ही प्रचंड वाहतूककोंडीची आहेत का, असा प्रश्न जुनेजा यांना विचारला असता पोलिसांनी प्रस्तावित केलेली वाहतूककोंडीची ठिकाणे आम्ही प्रकल्पात घेतली आहेत, असे ते म्हणाले.
सिग्नल यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली असली, तरी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या यादीतील पहिले काम कमांड कंट्रोल रूमचे पूर्णत्वास येणार आहे. हे काम आॅक्टोबरपूर्वी पूर्ण होईल. ही रूम महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील जुन्या महापालिका सभागृहाच्या जागेत साकारली जाणार आहे. तर, दुसरी कमांड कंट्रोल रूम ही पोलीस उपायुक्त कार्यालयात साकारली जाणार आहे.
निविदा प्रक्रिया सुरू
स्टेशन परिसर विकासाची निविदा आयआयटीकडे मूल्यमापनासाठी पाठविली आहे. काळातलाव नूतनीकरण, स्काडा प्रणाली, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नदीकिनारा विकास या कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ते मंजूर आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर, विकास परियोजनेला हात घातला जाणार आहे.