मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: April 13, 2017 03:13 AM2017-04-13T03:13:01+5:302017-04-13T03:13:01+5:30

निवडणुकांच्या काळात गाजावाजा करीत शिवसेनेने सुरू केलेले मल्टी स्पेशालिटी रुग्णालय एक दिवास्वप्नच ठरले आहे. या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही.

Multi Specialty Hospital Expert awaiting doctor | मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतीक्षेत

मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : निवडणुकांच्या काळात गाजावाजा करीत शिवसेनेने सुरू केलेले मल्टी स्पेशालिटी रुग्णालय एक दिवास्वप्नच ठरले आहे. या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना येथून सायन, नायर, केईएम या प्रमुख रुग्णालयांकडे पाठवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून शिवसेनेला स्वपक्षीय नगरसेविकांनी घरचा अहेर दिला.
रस्ता दुर्घटनेत जखमींना तत्काळ उपचार मिळण्यासाठी जोगेश्वरी येथे २०१३मध्ये ट्रॉमा सेंटर उभे करण्यात आले. या रुग्णालयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. बोरीवली येथील भगवती रुग्णालयासारखी मल्टी स्पेशालिटी रुग्णालये विधानसभा निवडणुकीच्या काळात उभी करण्यात आली. शिवसेनेच्या वचननाम्यातही या अद्ययावत रुग्णालयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र या रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय यंत्र, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल आणि शुभदा गुडेकर यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले.
पाचशे खाटांचे जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर येथे भूलतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट अशी तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत, याकडे शिवसेनेच्या पटेल यांनी लक्ष वेधले. दररोज दीड हजार बाह्य रुग्ण येत असलेल्या भगवती रुग्णालयातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प घेऊन पाच वर्षे झाली तरी येथे येणाऱ्या रुग्णांना आजही प्रमुख रुग्णालयांकडे पाठवण्यात येत असल्याची नाराजी शुभदा गुडेकर यांनी व्यक्त केली. या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. गोवंडी शताब्दी रुग्णालयाची वेगळी कहाणी नाही, याकडे स.पा.चे गटनेते राईस शेख यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)

प्रमुख रुग्णालयांवरील रुग्णांचा भार वाढत असल्याने उपनगरात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिकेच्या गेल्या निवडणुकीच्या काळात झाला. त्यानुसार घाटकोपर राजावाडी, गोवंडी येथील शताब्दी, बोरीवली येथील भगवती, अंधेरीचे कूपर या रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा आणून उपनगरातील रुग्णालये सक्षम करण्यात येणार होती.
वैद्यकीय महाविद्यालयात १३८ आणि रुग्णालयांमध्ये २९० डॉक्टर्स व परिचारिकांची पदे रिक्त आहेत. पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी स्थायी समितीमध्ये सांगितले.

Web Title: Multi Specialty Hospital Expert awaiting doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.