सूतिकागृह होणार मल्टिस्पेशालिटी, केडीएमसीकडून निविदा प्रक्रिया लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:06 AM2019-02-09T03:06:01+5:302019-02-09T03:07:21+5:30
पूर्वेत असलेले केडीएमसीचे सूतिकागृह काही वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - पूर्वेत असलेले केडीएमसीचे सूतिकागृह काही वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लवकरच निविदा (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागवण्यात येणार आहेत. सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने याचा आराखडा तयार केला असून राज्यातील सर्वोत्तम रुग्णालय करण्याचा मानस आहे. तळघर अधिक ११ मजल्यांचे बांधकाम करण्यासाठी सुमारे २८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याव्यतिरिक्त रुग्णालयातील अन्य आवश्यक सुविधांसाठी वेगळा निधी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांची छाननी करून जास्तीतजास्त सुविधा देणाऱ्या संस्थेला हा प्रकल्प महापालिका देईल. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या आजी व माजी वैद्यकीय अधिकाºयांनी प्रकल्प विभागाला मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, तयार आराखडा हा महापालिकेच्या नगररचना विभागाकडून तत्त्वत: मंजूर करून त्यानुसार मूळ बांधकामाच्या प्राकलनाची अंदाजे किंमत काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
प्रस्ताव आल्यानंतर ते अंतिम मंजुरीसाठी महासभेसमोर सादर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. तळघर ते पहिले चार मजले हे रुग्णालय असणार आहे. अन्य मजल्यांवर डॉक्टरांसाठी क्वॉर्टर्स, नर्स क्वॉर्टर्स आदींसह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, अशी अपेक्षा विशेष प्रकल्प विभागाने केली आहे.
असा असेल प्रकल्प
पूर्वेकडील टिळक पथाजवळील मुख्य रस्त्यालगत हा भूखंड आहे. एकूण ३३०० चौरस मीटरच्या जागेमध्ये दोन एफएसआय मिळून हे अद्ययावत रुग्णालय बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामध्ये १० हजार चौरस फुटांवर बांधकाम अधिक वाहनतळ सुविधा तसेच रुग्णालयाला आवश्यक यंत्रसामग्रीची सुविधा त्यात असेल.
या प्रकारची सुविधा देण्याचा मानस असलेल्या संस्थांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. चार ते पाच हजार चौरस फुटांमध्ये सूतिकागृह बांधण्यात येणार आहे. उर्वरित जागा मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि त्यासाठी आवश्यक सुविधांसाठी मिळणार आहे. तळमजल्यावर पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे.