बहुभाषिक विद्यार्थ्यांना चित्र, गाण्यांचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:59 AM2018-06-22T02:59:24+5:302018-06-22T02:59:24+5:30
परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांची मुले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकत असून, त्यांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना चित्र, गाणी आणि गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे.
- जान्हवी मौर्य
डोंबिवली : परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांची मुले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकत असून, त्यांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना चित्र, गाणी आणि गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे.
डोंबिवलीतील मोठागाव ठाकूर्ली येथील लोकमान्य टिळक पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापक रेखा आव्हाड यांनी सांगितले की, आमच्या शाळेत हिंदी, कन्नड भाषिक बालवाडीकरिता चार व पहिलीत दोन विद्यार्थी आहेत. त्यांना मराठी बोलता येत नाही. त्यांचे आईवडील मजूर आहेत. काही विद्यार्थ्यांचे आईवडील हे भाजीविक्रीचा धंदा करतात. त्यांना चित्र, गोष्टी आणि गाणी यांच्या माध्यमातून मराठी शिकवावे लागते. आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ई लर्निंग सुविधा आहे. चार्ट, कार्डचाही वापर केला जातो. या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांना कधी सुटीही द्यावी लागते. अन्यथा त्यांची शाळा सुटू शकते.काही मुले अचानक शाळेत येणे बंद झाली तर त्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करावे लागते. त्यामुळे मराठी भाषिक मुलांच्या तुलनेत बहुभाषिक मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे लागते.
डोंबिवलीजवळ असलेल्या नांदिवली पाडा येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या नंदादीप शाळेचे मुख्याध्यापक अशोक पासळकर यांनी सांगितले, या शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने तेथे काम करणाऱ्या कामाठी व मजुरी करणारे असे कामगार असून, त्यांच्या मुलांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आमच्या शाळेत आंतरभारतीचे दर्शन होते. पंजाब, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, आंध्रप्रदेश, नेपाळ या भागातील कामगार काम करीत असून ते त्याच भागात मुक्कामला असल्याने पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
आमच्या शाळेत कोणतीही फी आकारली जात नाही. शैक्षणिक साहित्य, गणवेश विद्यार्थ्यांना मोफत दिले जातात. विविध भाषिक मुले आपणहून शाळेत दाखल झाली आहेत. त्यांना आम्हाला मराठीतून शिकविण्यासाठी त्यांच्या भाषेतून सांगावे लागते. एकाच वेळी तीन चार भाषेतून शिक्षण द्यावे लागते. हे विद्यार्थी इतर भाषिक असले तरी त्यांना मराठीतून शिक्षणाची आवड आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:हून शाळेत प्रवेश घेतला आहे.
>कल्याणच्या गांधी चौकातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक भगवान दळवी यांनी सांगितले की, आमच्या शाळेत बहुभाषिक मुले आहेत. गुजराती मुलांनी त्यांच्या भाषेतून शिक्षण घेतले पाहिजे, मुस्लिम मुलांनी उर्दू भाषिक शाळेतून शिक्षण घेणे अपेक्षित आहे. मात्र आसपासचा परिसर मराठी असल्याने ही मुले मराठी शाळेत शिकणे पसंत करीत आहेत. त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणे कठीण नाही. आमच्या शाळेत ई लर्निंग नाही. त्यामुळे मुलांना जुळवून घ्यावे लागते. काही फळ विक्रेत्यांची, भाजी विक्रेत्यांची मुले आहेत. त्यांना शिक्षणात सूट द्यावी लागते. शाळेत पाच ते सहा मुले बहुभाषिक आहेत. त्यांना मराठीतून शिक्षण दिले जात आहे.