गणपतीक यंदाही एसटीतूनच गावाक जाऊचा, १,९४९ बसचे बुकिंग, ग्रुप बुकिंगला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 14:15 IST2023-09-12T14:14:53+5:302023-09-12T14:15:11+5:30
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवासाठी यंदार्ही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ठाणे विभागाने १५०० गाड्यांचे नियोजन केले होते, परंतु आतापर्यंत १,९४९ गाड्यांचे बुकिंग झाल्याचे समोर आले आहे.

गणपतीक यंदाही एसटीतूनच गावाक जाऊचा, १,९४९ बसचे बुकिंग, ग्रुप बुकिंगला पसंती
ठाणे - गणेशोत्सवासाठी यंदार्ही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ठाणे विभागाने १५०० गाड्यांचे नियोजन केले होते, परंतु आतापर्यंत १,९४९ गाड्यांचे बुकिंग झाल्याचे समोर आले आहे. त्यातही १,४७५ बसचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. यात राजकीय मंडळींनीच या बस अधिक प्रमाणात बुक केल्याने चाकरमान्यांनीही त्याला पसंती दिली आहे, तर ४७४ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
गौरी-गणपती या सणासाठी येत्या १४ ते १८ सप्टेंबरदरम्यान मुख्य वाहतूक होणार आहे, तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस आधी आरक्षण करण्याची सोय असल्याने यंदा गौरी-गणपती जादा वाहतुकीसाठी १४ जुलैपासून आरक्षण सुरू झाले. सलग तिसऱ्या वर्षी ठाणे विभागातून गणेशोत्सवातकोकणवासीयांसाठी बसची संख्या वाढली आहे. २०२२ या वर्षी एक हजार ८ गाड्यांचे नियोजन केले होते.
असे आहे नियोजन
ठाणे विभागातून २०२१ साली ८०० गाड्यांचे नियोजन केले होते. तेव्हा ८४५ एवढ्या गाड्या सोडल्या होत्या.
२०२२ मध्ये १००८ गाड्यांचे नियोजन झाले, तर १ हजार ३७२ गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
यंदा १ हजार ५०० गाड्यांचे नियोजन केले होते. परंतु आतापर्यंत १,९४९ बसचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
मोफत प्रवासाला अधिक प्रतिसाद
यंदा ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत, तर महिलांसाठी ५० टक्के सवलत यांमुळे बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड मागविले जात आहे. त्यानुसार ज्येष्ठ किती, महिला किती आणि पुरुष किती अशी माहिती दिली जात असून, त्यामुळे एसटीचा खर्च कमी होताना दिसत आहे.