Video: सापाने केला लोकल प्रवास, प्रवाशांची उडाली पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:36 AM2018-08-02T11:36:03+5:302018-08-02T16:00:19+5:30
ठाणे स्थानकात टिटवाळा ते सीएसएमटी लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली.
ठाणे : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक नवनवीन किस्से हे रोजच्या प्रवासादरम्यान घडत असतात. पाऊस तर कधी तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ही विस्कळीत होत असेत. मात्र गुरुवारी (2 ऑगस्ट) चालत्या लोकलमध्ये साप आढळल्याने काही वेळ लोकल थांबवण्यात आली.
ठाणे स्थानकात टिटवाळा ते सीएसएमटी लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली. लोकल ठाणे स्थानकात आल्यानंतर एका प्रवाशाने डब्यातील फॅन सुरू करण्याचा प्रयत्न करताना तेथे साप असल्याचे त्याचे लक्ष आले. त्यानंतर त्याने अन्य प्रवाशांना याबाबत माहिती दिली.
पंख्यात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ सुरु झाला. प्रवाशांपैकी एका व्यक्तीने काठीच्या मदतीने तो साप फॅनवरून खाली काढला आणि स्थानकातील रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यामध्ये फेकून दिला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. हरणटोळ जातीचा हा साप असून तो निरुपद्रवी आहे. त्यामुळे या सापाकडून प्रवाशांना काही धोका नसल्यामुळे तसेच लोकलला उशीर नको म्हणून काही प्रवाशांनी लोकल त्वरित सीएसएमटीकडे नेण्याची विनंती केली.